आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seized Cylinder Security Issue In Waluj Midc Aurangabad

धोकादायक कारवाई, गावकरी ‘गॅस’वर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज एमआयडीसी परिसरातील 20 हजार स्क्वेअर फूट जागा सागर प्लास्टिक इंडस्ट्रीजच्या मालकीची आहे. नंतर ही जागा माजी आयुक्त बाळासाहेब सानप यांच्या स्नुषा प्रतिभा किरण सानप यांनी किरण इंडस्ट्रीज या नावाने विकत घेतली. त्यानंतर ती त्यांनी मोक्षा गॅस इंडस्ट्रीजचे अजित सुरेश जैन यांना 5 वर्षांच्या भाडेतत्त्वावर उद्योगासाठी वापरण्यास दिली. मासिक 27 हजार रुपये भाड्याप्रमाणे ही जागा जुलै 2010 मध्ये देण्यात आली. तसा करारही करण्यात आला. दरम्यान, चांगला भाव आल्याने किरण इंडस्ट्रीजच्या मालकाने ही जागा विक्रीस काढली. त्यासाठी त्याने भाडेकरूला जागा रिकामी करण्यास सांगितले. मात्र, 5 वर्षांचा करार असल्याचे सांगत अजित जैन यांनी जागा रिकामी करण्यास नकार देत इतरत्र उपलब्ध झाल्यास रिकामी करू, असे सांगितले. तरीही जागा तातडीने रिकामी करा, असा तगादा सानप यांनी लावला. व्यवसायात नुकसान होऊ नये म्हणून जैन यांनी न्यायालयात धाव घेतली. 5 वर्षांपर्यंत जैन यांनीच या जागेवर व्यवसाय करावा, असा निकाल न्यायालयाने दिला. न्यायालयाचा हा निकाल सानप यांच्या पचनी पडला नाही. त्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीला हाताशी धरून जैन यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडले.

नोटिसा आणि कारवाईचा निर्णय
रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीने किरण इंडस्ट्रीजला नोव्हेंबर महिन्यात कर थकवल्यामुळे नोटीस बजावली. ही नोटीस मालक किरण सानप यांनी परस्पर दाबून ठेवली. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी सात दिवसांत कर भरावा, अशी नोटीस पुन्हा बजावण्यात आली. ही नोटीसदेखील सानप यांनी दाबून ठेवली. परिणामी ग्रामपंचायतीने थेट कारवाईचा बडगा उचलत भाडेकरू जैन यांच्या मालकीच्या मोक्षा गॅस इंडस्ट्रीजवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

114 सिलिंडर केले जप्त
रांजणगाव ग्रामपंचायतीने थेट कारवाईचा बडगा उगारला. जैन यांनी कारण विचारले असता कर भरला नसल्याने जप्तीची कारवाई करण्यात येत असल्याचे ग्रामविकास अधिकार्‍याने सांगितले. त्यावर मी सर्व कर भरण्यास तयार आहे, असे जैन यांनी सांगितले; परंतु ग्रामविकास अधिकार्‍याने कर घेण्यास नकार दिला. त्यानंतर जैन यांच्या कंपनीतील जवळपास 114 गॅस सिलिंडर, दोन सेफ्टी फायर सिलिंडर आणि वजन काटा इत्यादी साहित्य जप्त केले. विशेष म्हणजे जप्त केलेल्या सिलिंडरपैकी 25 सिलिंडर कार्बन डायऑक्साइडने भरलेले आहेत. त्यानंतर ग्रामपंचायतीने जप्त केलेले हे सर्व सिलिंडर स्मशानात आणून ठेवले.

ग्रामपंचायतीने केला नियमाचा भंग
गॅसने भरलेले सिलिंडर जप्त केल्यानंतर ते फायर सेफ्टी असलेल्या रूममध्ये ठेवणे बंधनकारक आहे. तसेच ते आडवे न ठेवता उभ्या अवस्थेत ठेवावे लागतात. मात्र, अशा कोणत्याच नियमाचे पालन ग्रामपंचायतीने केलेले नाही. यातील एका सिलिंडरचादेखील स्फोट झाला तर सर्व सिलिंडर पेट घेतील आणि त्याचा फटका शेजारील ग्रामस्थांना बसेल.

ग्रामपंचायत कर घेईना, पोलिस तक्रार..
कारवाई नाट्यानंतर अजित जैन यांनी तत्काळ करापोटी असलेल्या 3 लाख 10 हजार रुपयांचा एचडीएफसी बँकेचा धनाकर्ष तयार केला. तो ग्रामपंचायतीला देण्यास गेले, परंतु हा धनाकर्ष घेण्यास ग्रामविकास अधिकार्‍याने नकार दिला. हा कर आम्ही मूळ मालकाकडूनच घेऊ, असे त्यांनी सांगितले. वास्तविक ग्रामपंचायतीने कर भरून घेणे आवश्यक होते. कारण भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेचा करार व न्यायालयाची प्रतही त्यांनी सादर केली होती. मात्र, जमीन मालकाच्या दबावापोटी हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. कर नाही घेतला तरी चालेल, पण जप्क केलेल्या सिलिंडरची जबाबदारी ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जैन यांचे म्हणणे आहे. याबाबत पोलिसांनीही तक्रार घेण्यास नकार दिला.

किरण इंडस्ट्रीजला आम्ही दरमहा भाडे देतो. त्यामुळे कर भरण्याची जबाबदारी मालकाची ठरते. करारातही तसे नमूदही आहे. असे असताना जाणीवपूर्वक आमचा व्यवसाय बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी कर भरण्यास तयार आहे, पण ग्रामपंचायत तो स्वीकारण्यास तयार नाही. ग्रामपंचायतीने कर घ्यावा व आमचा माल परत द्यावा. जप्त केलेल्या सिलिंडरचा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? हेदेखील सांगण्याल कोणीच तयार नाही. -सुजित जैन, संचालक, मोक्षा गॅस इंडस्ट्रीज

सानप नॉट रिचेबल
या प्रकरणी कंपनीच्या मालक किरण सानप यांच्याशी भ्रमणध्वनी, कार्यालय व घरच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.

थेट सवाल: कांताबाई जाधव, सरपंच, रांजणगाव
ग्रामपंचायतीने कर न भरलेल्या किरण इंडस्ट्रीजवर कारवाई केली का?
-हो, केली आहे. 3 लाखांचा कर न भरल्याने 114 सिलिंडर जप्त केले आहेत.
कर भरण्यास तयार असताना आपण तो स्वीकारत का नाही?
-तसे होणार नाही, आमच्याकडे पैसे भरण्यासाठी कुणीच आलेले नाही.
कारवाई केलेली व्यक्ती भाडेकरू आहे. मालकांच्या म्हणण्यानुसार कारवाई होत असल्याचा आरोप आहे?
-नाही, ग्रामपंचायतीला कराशी संबंध आहे. भाडेकरू कोण किंवा मालक कोण, यांच्याशी संबंध नाही. योग्य व्यक्तीने येऊन कागदपत्रे दाखवून द्यावी. कर स्वीकारून जप्त केलेला माल परत देऊ.
जप्त केलेले सिलिंडर स्मशानात ठेवले आहेत. अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण?
-ती जबाबदारी आमची आहे. मात्र, आम्ही सर्व बाजूंनी सुरक्षा यंत्रणा बसवली आहे. तसे असल्यास काळजी घेऊ.

काय आहे धोका?
ग्रामपंचायतीने स्मशानभूमीत ठेवलेले गॅस सिलिंडर आडवे करून ठेवले आहेत. त्यामुळे त्यांचे एकमेकांना घर्षण होऊन लिक होण्याची शक्यता आहे. आडवे सिलिंडर जास्त जागा व्यापतात. जर त्यांचा स्फोट झाला तर त्याचा फटका 20 हजार मीटरवरील परिसराला बसू शकतो. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास 10 ते 20 फायर सेफ्टी फायर सिलिंडर असणे गरजेचे आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने अशी कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे धोका अद्याप टळलेला नाही.