आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंरोजगाराची ‘झिंग’ सक्षमीकरणाचा ‘उतारा’ ; दीडशे महिलांना रोजगार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खांदेवाडीच्या युवकाने महिलांसाठी सुरू केला हँडग्लोज निर्मिती प्रकल्प, गावातील दीडशे महिलांना करणार सक्षम - Divya Marathi
खांदेवाडीच्या युवकाने महिलांसाठी सुरू केला हँडग्लोज निर्मिती प्रकल्प, गावातील दीडशे महिलांना करणार सक्षम
औरंगाबाद: जुगार खेळणे आणि दारू पिऊन बायकांना मारहाण करणे हा पुरुषांचा नित्यक्रम... त्यामुळे घरखर्च कसा भागवायचा हा गावातील माय-भगिनींचा रोजचाच प्रश्न... महिलांची ही व्यथा गावातीलच एका तरुणाच्या हृदयाला भिडली आणि त्याने महिलांनाच सक्षम करण्याचा निर्णय घेतला... आदर्श ग्राम पाटोद्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या पैठण तालुक्यातील खांदेवाडीच्या गणेश देसाई या तरुणाने गावातील महिलांना गावातच रोजगार मिळवून दिला. यामुळेच त्याचे कार्य दखलपात्र आहे. 
 
खांदेवाडी हे ७५० लोकसंख्येचे छोटेसे गाव. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय. मात्र, येथील ६० टक्के पुरुषांमध्ये दारूचे व्यसन. जुगार खेळणाऱ्यांचे प्रमाणही जास्त. गावातील तरुण मंडळी हंगामामध्ये शेती करतात आणि सुट्यांमध्ये रोजंदीरीची कामे. गावातील बहुतांश पुरुष उन्हाळ्यामध्ये दिवसभर जुगार खेळतात. रात्री दारू पिऊन घरी आल्यानंतर बायकांना मारहाण करतात. दारू आणि जुगारामध्ये भरपूर पैसा खर्च होत असल्याने घर कसे चालवायचे, हा प्रश्न घरातील महिलांसमोर उभा राहायचा. गणेश देसाईने यावर उपाय शोधला आहे. त्याने गावातच जागा विकत घेऊन तिथे जीन्सच्या कपड्यापासून हँडग्लोज बनवण्याचा प्रकल्प सुरू केला असून त्यामध्ये गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 
 
नोकरी करत उद्योग 
गणेश देसाईने मटेरियल मॅनेजमेंट विषयामध्ये पुणे येथे एमबीए केले. वाळूज येथील यशश्री प्रेस कॉम्प लिमिटेडमध्ये नोकरी मिळाली. काम करत असतानाच फॅक्टरी कामगारांना दैनंदिन लागणाऱ्या हँडग्लोजची कमतरता असल्याची माहिती मिळाली आणि याची निर्मिती करून महिलांना रोजगार देण्याचे मनोमन ठरवले. गावामध्येच एका मशीनवर निर्मिती सुरू केली. आज त्याच्याकडे २० मशीन आहेत. गावातील दारू पिणाऱ्यांचे आणि जुगार खेळणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने याच व्यवसायाच्या जोरावर महिलांना रोजगार मिळवून देण्याचे त्याने ठरवले.
 
स्वखर्चाने महिलांना प्रशिक्षण 
गावामध्येच जीन्सच्या कपड्यापासून हँडग्लोज निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी गणेशने पैशांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी त्याने गावातील महिलांना प्रशिक्षित करण्यासाठी स्वखर्चातून त्यांना प्रशिक्षण दिले. पंढरपूर येथील तीन महिलांनी गावातील महिलांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण दिले. यासाठी त्याला ५० हजार रुपये खर्च आला. सुरुवातीला प्रशिक्षित झालेल्या १५ महिलांच्या हाताला काम मिळवून दिले. 
 
काय आहे प्रोजेक्ट? 
स्वत:चा हँडग्लोजचा उद्योग आणि कंपनीतील नोकरी सांभाळत गणेशने गावामध्ये लाख रुपये किमतीची हजार चौरस फूट जागा विकत घेतली. तिथे त्याने जीन्सच्या कापडापासून हँडग्लोज निर्मितीच्या प्रकल्पासाठी इमारत बांधकामास सुरुवात केली. सुरुवातीला सात शिलाई मशिन्स खरेदी केल्या. त्याद्वारे गावातीलच प्रशिक्षित महिलांकडून हँडग्लोजची निर्मिती सुरू आहे. हा माल वाळूज परिसरातील कंपन्यांना मागणीनुसार पुरवला जातो.
 
 दीडशे महिलांना रोजगार 
भंगारातील जीन्स पँटच्या कपड्यांपासून हँडग्लोज निर्मितीच्या प्रकल्पाद्वारे मिळालेल्या उत्पन्नातून गावातील वृद्ध, विधवा आणि घर सांभाळणाऱ्या महिलांना स्वखर्चाने प्रशिक्षित करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे उद्दिष्ट गणेशने बाळगले आहे. जेणेकरून त्यांना पुरुषांवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. गावातील महिलांसोबतच शेजारील गावातील महिलांच्या हातालाही काम देणार असल्याचे गणेशने सांगितले.
 
गावातील महिलांना गावातच रोजगार मिळाला तर त्यांच्या हाताला कामही मिळेल आणि त्यांना घरखर्चही भागवता येईल. या उद्देशाने हँडग्लोज निर्मितीचा छोटासा प्रकल्प उभारला आहे. ग्रामीण भागातील महिला सक्षम झाल्या पाहिजेत, या एकमेव उद्देशाने मी काम करत आहे.- गणेश देसाई, खांदेवाडी
 
बातम्या आणखी आहेत...