आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर तारुण्यात मला वार्धक्यात ढकलू नका हो!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय चळवळीचा साक्षीदार असलेला मी आज (30 सप्टेंबर) वयाची 25 वर्षे पूर्ण केली. खर्‍या अर्थाने मी आता तरुण झालो आहे. माझ्या अंगा-खांद्यावर खेळत अनेक कलावंत घडले. राजकीय कार्यकर्ते मोठय़ा पदांवर पोहोचले. सामाजिक चळवळीत उंचावर पोहोचले. मात्र, माझ्या तब्येतीची कुणी फारशी काळजी घेतली नाही. त्यामुळे ऐन तारुण्यातच मला अकाली वार्धक्याकडे ढकलले जात आहे.

ज्या कलावंतांना तुम्ही मोठय़ा रुपेरी अन् छोट्या पडद्यावर पाहता त्यातील अनेकजण माझे सवंगडी आहेत. त्यांचे दर्जेदार कार्यक्रम मी पाहिले, अनुभवले. बच्चे कंपनीची निरागसता आणि तरुणाईचा जल्लोषही मला रोमांचित करून केला. कधी खळखळून हसणारे तर कधी गंभीर झालेले चेहरे मी पाहिले. दज्रेदार लावण्या आणि सुगम, शास्त्रीय संगीताच्या मैफलीत मी पण भान विसरलो. अनेक हृद्यसत्कारांनी पाणावलेले डोळे, समाधान देऊन गेले मला. आता दुर्लक्षाच्या भावनेतून अश्रू वाहत आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे की, महापालिकेला माझी दुरुस्ती करण्यास, मला सतत अद्ययावत ठेवण्यास सांगा. मनोरंजनाचा आनंद घेण्याऐवजी तोडफोड करणार्‍यांना तुम्ही जाब विचारावा, असे मला मनापासून वाटते. या शहरात आलो तेव्हा एकाच वेळी 52 आवाजात गाणार्‍या मिनल सिंह चा ‘सुनेहरी यादें’ हा कार्यक्रम मी पाहिलेला पहिलाच कार्यक्रम होता. दिलीप प्रभावळकर, मोहन गोखले, मोहन आगाशे, सविता प्रभुणे, गिरीश ओक, संजीव अभ्यंकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, वर्‍हाडकार (कै.) प्रा. लक्ष्मण देशपांडे अशा अनेकांना मी फार जवळून पाहिलंय. मुंबई गाजवत असलेले कलावंत मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, प्रतीक्षा लोणकर, नंदू काळे, शिल्पा (मिताली) जगताप, अरविंद जगताप, किरण पोत्रेकर, राजेश शिखरे माझ्या अंगा-खांद्यावर खेळत मोठे झाले. त्या सार्‍यांनीही माझी आठवण ठेवावी, अशी अपेक्षा आहे. लवकरच एसी लावून मला मुंबई-पुण्यातील नाट्यगृहांप्रमाणे बनवण्यात येणार आहे, असे म्हटले जाते. बर्‍याच वेळा मला प्रश्न पडतो की, इतक्या वेळी माझ्या देखभालीच्या मोहिमा झाल्या. कोट्यवधी रुपये खर्च झाले तरी माझ्या प्रकृतीत सुधारणा का होत नाही? कुणीतरी लक्ष देईल का याकडे?मध्य महाराष्ट्रातील सवरेत्तम
संत एकनाथ रंगमंदिर सवरेत्तम नाट्यगृह आहे. मी 23 वर्षांपूर्वी येथे पहिले नाटक आणले होते. दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी, स्वाती चिटणीस, अतुल परचुरे हे कलावंत तेव्हा आले होते. संत एकनाथ पाहून ते खूप आनंदी झाले होते. संदीप सोनार, नाट्य कंत्राटदार


शहरातील नाट्यसंस्कृती टिकली
मी आजवर संत एकनाथमध्ये 3500 पेक्षा जास्त कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या नाट्यगृहामुळेच औरंगाबादची नाट्य संस्कृती टिकली आहे. या नाट्यगृहाच्या प्रकृतीची वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे. राजू परदेशी, नाट्य कंत्राटदार