आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेल्फी’ बंद; गुरुजींना उगाच बसला स्मार्टफोनचा भुर्दंड !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी घेतलेला सेल्फीबाबतचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. सुरुवातीला सेल्फी काढण्यात काय गैर आहे, असे म्हणणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीच खुद्द हा निर्णय स्थगित केल्याचे सांगितले. परंतु हा निर्णय लागू करताना शिक्षकांना करण्यात आलेल्या सक्तीमुळे अनेक शिक्षकांनी स्मार्टफोन खरेदी केले. सेल्फीच्या निर्णयामुळे त्यांच्या खिशाला मात्र भुर्दंड बसला. आधीच हा निर्णय घेतला असता तर किमान खर्च तरी झाला नसता, अशी चर्चा शिक्षक वर्तुळात रंगली आहे. 
 
शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केल्यानंतर त्यांची उपस्थिती नियमित राहावी, कोणते विद्यार्थी उपस्थित नाहीत याचा शोध घेता यावा यासाठी काही दिवसांपूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून ती शिक्षण विभागाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जानेवारीच्या पहिल्या सोमवारी काही शाळांमध्ये सेल्फीचा प्रयोग करण्यात आला, तर काही शिक्षक संघटनांनी या सेल्फी उपक्रमास विरोध दर्शवला. 
 
विविध शिक्षक संघटनांनी राज्यभरात निवेदनाद्वारे याला आपला विरोध असल्याचे दाखवूनही दिले. ज्यांनी सेल्फी काढली त्यांना ऑनलाइन पाठवतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. निर्णयाची अंमलबजावणीही अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने केली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी असलेला हा निर्णय काही अधिकाऱ्यांनी सरसकट सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू केला. हा निर्णय फक्त शाळाबाह्य मुलांसाठी आहे. त्यासंबंधी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. 
 
हा सर्व खटाटोप एका सेल्फीपायी केला असला तरी अनेक शिक्षकांकडे स्मार्टफोन नाही. त्यामुळे अनेकांनी दहा-बारा हजारांपर्यंतचे स्मार्ट फोन त्या सेल्फीसाठी विकत घेतले होते. घेतला तरी ताप नाही घेतला तरी संताप, अशी अवस्था शिक्षकांची झाल्याचे एका शिक्षकाने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. दरम्यान, शाळाबाह्य मुलांचा प्रश्न शिक्षक संघटना, प्रशासन आणि शिक्षणमंत्री यांच्यामुळे पुन्हा अधांतरी राहिला आहे. यावर काय निर्णय घेणार, असा सवाल स्वयंसेवी संस्था आणि शाळाबाह्य मुलांच्या अभ्यासकांनी विचारला आहे. 
 
खुश करण्यासाठी 
- शासनविरुद्ध संघटना या सेल्फीच्या सामन्यात राज्यातील लाख शाळाबाह्य लेकरं हरली आहेत. शासन आणि शिक्षक संघटना आता ही लाख मुले शाळेत आणण्यासाठी काय करणार आहेत? याचे उत्तर दोघांनीही द्यावे. एका क्षणात सेल्फीचा निर्णय रद्द करून संघटनांना खुश करणारे शिक्षणमंत्री या मुलांसाठी आता काय करणार आहेत हे सांगावे.
 - हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ तसेच शाळाबाह्य मुलांचे अभ्यासक