आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Semi English Education In Municipal School Aurangabad

महापालिकेच्या शाळेत भरणार सेमी इंग्रजीचे वर्ग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जागतिक स्पध्रेत विद्यार्थी मागे पडू नयेत तसेच शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी या वर्षीपासून मनपाच्या सहा उर्दू आणि नऊ मराठी अशा पंधरा शाळांमध्ये इयत्ता पाचवीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आदर्श आराखडा तयार केला आहे. मुख्याध्यापकांकडून यासंबंधीचा अहवालही मागवण्यात आला असून 5 जुलैला या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.

सेमी इंग्रजी शाळेचे शुल्क 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हा शुल्क परवडणारा नाही. अशा स्थितीत झोपडपट्टी भागात राहणार्‍या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आदर्श आराखडा तयार केला आहे. त्यानुसार शहरातील 15 शाळांच्या मुख्याध्यापकांना सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मनपा शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. सेमी इंग्रजी वर्ग सुरू झाल्यास मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्येत वाढ होऊ शकते. ज्या परिसरातील पालक आपल्या मुलांना सेमी इंग्रजीमध्ये शिक्षण देऊ इच्छितात. अशा शाळांची निवड करण्यात येईल. पालकांची संमती मिळाल्यानंतर आयुक्त या बाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मनपा शिक्षणाधिकारी ए. एम. शेख यांनी दिली आहे.

450 विद्यार्थ्यांना फायदा
शहरातील 15 शाळांत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू होणार आहेत. एका वर्गात 30 विद्यार्थी संख्या गृहीत धरली तर याचा फायदा 450 विद्यार्थ्यांना होणार आहे.

या शाळांचा होणार समावेश
हसरूल, नारेगाव, मिटमिटा, सिडको एन-7, मुकुंदवाडी, चिकलठाणा, एकनाथनगर, बनेवाडी, बायजीपुरा मराठी शाळा, नारेगाव उर्दू, किराडपुरा नंबर दोन उर्दू, यशवंतराव कॉलनी नंबर एक उर्दू, पैठण गेट उर्दू शाळा.

पालकांच्या संमतीने निर्णय
सेमी इंग्रजी सुरू करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. याबाबतचा अहवाल 5 जुलै रोजी माझ्याकडे येणार आहे. त्यानंतर आयुक्त अंतिम निर्णय घेतील. ज्या शाळेतील विद्यार्थी संख्या जास्त आहे अशा शाळांचा यात समावेश होणार आहे. ए. एम. शेख, शिक्षणाधिकारी, मनपा.

शिक्षकांना द्यावे प्रशिक्षण
विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी सेमी इंग्रजीची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने उचललेले पाऊल योग्य आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी. त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची निवड करावी किंवा शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे. संजय चौधरी, नगरसेवक