आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावणी परिषदेत युतीचे संकेत पण उपाध्यक्ष कोणाचा?'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - छावणी परिषदेत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या मित्रांत निवडणूकपूर्व युती झाली नसली तरी आता ती होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी यास दुजोरा दिला आहे. फक्त उपाध्यक्ष कोणाचा एवढ्यावरच बोलणी थांबली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सात सदस्यांच्या छावणी परिषदेच्या सभागृहात भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी २ सदस्य होते. मात्र त्यात भाजपने बाजी मारली. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी अपक्ष सदस्य संजय गारोल यांना भाजपच्या तंबूत डेरेदाखल केले. त्यामुळे भाजप सदस्यांची संख्या तीन झाली. भाजपचा अध्यक्ष करण्यासाठी त्यांना एकाच सदस्याची गरज आहे. तरीही शिवसेनेशी युती करावी, अशी भाजपची इच्छा आहे. तर दुसरीकडे सर्व प्रयत्न झाल्यानंतरही शिवसेनेला दुसरे सदस्य फोडण्यात यश येऊ शकले नाही.

अपक्षांचा पाठिंबा घेण्यात अडचण

शिवसेना आणि भाजप मिळून सदस्यसंख्या ५ होते. दोन सदस्य हे काँग्रेसचे आहेत. ते कोणाबरोबरही येण्यास राजी आहेत. मात्र त्यांना सोबत घेतल्यास येत्या काही दिवसांत होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत अडचण होऊ शकते म्हणून शिवसेना सदस्य थांबले आहेत. अन्यथा त्यांनी दोघा अपक्षांना सोबत घेऊन उपाध्यक्षपद घेण्याची तयारी चालवली होती. मात्र निवडणुकीत याचा फटका बसू शकतो, म्हणून ते थांबल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भाजपनेही प्रथमच येथे उपाध्यक्षपदावर दावा केला आहे. पहिले सव्वा वर्ष आम्हाला उपाध्यक्ष द्या, एवढीच मागणी करून ते शांत झाले आहेत. तर शिवसेनाही भाजपला पहिल्यांदा अध्यक्षपद देण्यास तयार असल्याचे सूत्रांकडून समजते.
अधिकार नाही, प्रतिष्ठेचा प्रश्न

छावणी परिषदेचे अध्यक्षपद हे लष्करी अधिकाऱ्याकडे असते. लोकनियुक्त नगरसेवकातून एकाला उपाध्यक्षपद दिले जाते. लष्कराची रचना तसेच अन्य बाबी लक्षात घेता उपाध्यक्षाला फारसे अधिकार देण्यात आलेले नाहीत. मात्र तरीही ते प्रतिष्ठेचे पद आहे. लष्कराचे अधिपत्य असले तरी एक सत्ता केंद्र या निमित्ताने ताब्यात असल्याचे दिसते.

आमची युतीची इच्छा

^संजय गारोल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची सदस्यसंख्या ३ झाली आहे. युती करण्याची आमची इच्छा आहे. परंतु प्रथम उपाध्यक्षपद भाजपकडेच हवे. त्यावर अजून निर्णय झालेला नाही. किशनचंद तनवाणी, माजी आमदार.

चर्चेनंतर ठरवू

^ युती होणारच, यात शंका नाही. फक्त उपाध्यक्षाची निवडणूक जाहीर होण्याची आम्हाला प्रतीक्षा आहे. चर्चेला बसल्यानंतर योग्य तो निर्णय होईल. भाजपकडे तीन सदस्य असल्याने त्यांना आधी संधी दिली जाऊ शकते. अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख शिवसेना.