आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेकडून चंद्रकांत खैरेंचे पंख छाटण्याच्या हालचाली, मनपा निवडणुकीची आखली रणनिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत शहरासह जिल्ह्यात शिवसेनेचे पानिपत झाल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर "मातोश्री'ची खप्पामर्जी झाली असून येणाऱ्या मनपा निवडणुकीची रणनीती आखताना खैरे यांचे अधिकार मर्यादित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरातील तिन्ही शहरप्रमुखांवर देखरेख करण्यासाठी महानगरप्रमुख हे नवीन पद निर्माण केले जाणार अाहे. दुसरीकडे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचेही संकेत आहेत.

मुंबईत आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादसंदर्भात एक बैठक घेतली. त्यात खैरे यांच्याबाबत उघड नाराजी व्यक्त करण्यात आली. शाखाप्रमुखापासून जिल्हाप्रमुखापर्यंत कोणत्याही पदावर खैरे यांच्याच पसंतीने नियुक्ती करण्यास विरोध करण्यात आला. विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या लाजिरवाण्या पराभवाची ताजी पार्श्वभूमी असल्याने संघटनात्मक बदल करण्याचे संकेत ठाकरे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पूर्व, पश्चिम व मध्य या तिन्ही मतदारसंघासाठी मिळून महानगरप्रमुख हे नवीन पद निर्माण केले जाणार असून त्यावर खैरे यांच्या जवळची व्यक्ती राहणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या शहरातील प्रभावाचा वापर करून घेण्यासाठी मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यासही ठाकरे अनुकूल असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व हालचालींना खासदार खैरे यांनी विरोध केल्याचेही सूत्रांनी सांगितले असले तरी त्याचे पंख छाटले जाणार हे नक्की.