आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sena Officers In Samarth Nagar Area For Kahire Son

उपनेते खैरे यांचा अर्धा दिवस मुलगा, पुतण्याच्याच वाॅर्डात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - एम.पी. लॉ कॉलेजच्या केंद्रावर खासदार खैरे बाउन्सरच्या गराड्यात ठाण मांडून होते.
औरंगाबाद - मुलगा ऋषिकेश (समर्थनगर) आणि पुतण्या सचिन (गुलमंडी) हे लढत असलेल्या वाॅर्डांतील लढती तुल्यबळ असल्याने पराभवाच्या भीतीने गेले दोन दिवस खैरे यांनी स्वत:ला या दोन वाॅर्डांतच बंदिस्त केल्याचे चित्र होते.
मतदानाच्या दिवशीही ते सकाळी तीन तास सायंकाळी पुन्हा दोन तास याच वाॅर्डांत होते. त्यामुळे अर्थातच शहरातील अन्य वाॅर्डांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. एका उपनेत्यानेच आपल्याच नातेवाइकांवर लक्ष केंद्रित केल्याबद्दल अन्य उमेदवारांनी अर्थातच नाराजी व्यक्त केली.
गुलमंडीवर या वेळी शिवसेनेला शिवसैनिकांनीच कडवे आव्हान दिले आहे.
राजू तनवाणी आणि पप्पू व्यास यांच्यापुढे सचिन खैरे यांची ताकद कमी पडत असल्याचे समजताच स्वत: खैरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून या वाॅर्डावर भर दिला. जाहीर प्रचार संपल्यानंतर विविध समाज मंडळांच्या बैठका घेतल्या. मंगळवारी रात्री एक वाजेपर्यंत येथे एका समाजाची बैठक त्यांनी घेतली. त्यानंतर पुन्हा समर्थनगरावर लक्ष केंद्रित केले.

मतदानाला सुरुवात होताच खैरे यांनी मछली खडक येथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला आणि लगेच जिल्हा परिषद येथील मतदान केंद्रावर दाखल झाले. येथे ते तीन तास होते. या काळात त्यांनी मतदारांच्या भेटी घेत, बंडखोरांना गाडा, गुलमंडीवर भगवाच फडकला पाहिजे, असा प्रचार केला. येथे ते तीन तास होते. त्यानंतर त्यांनी गजानन महाराज मंदिर परिसरातील काही वाॅर्डांत जाऊन पाहणी केली अन् दुपारच्या सत्रात पुन्हा समर्थनगरात दाखल झाले.

जैस्वाल गुलमंडी बाहेर

माजी आमदार प्रदीप जैस्वाल विविध वाॅर्डांत फिरत होते. ज्या गुलमंडी, समर्थनगरावर खैरे यांनी सर्व शक्ती पणाला लावली, तेथे ते फारसे फिरकले नाहीत. सकाळी मतदान केल्यानंतर ते गुलमंडीतून बाहेर पडले. ते सायंकाळपर्यंत आले नव्हते. समर्थनगरातही ते फारसे फिरले नसल्याचे सांगण्यात येते.

तनवाणींनी बसूनच खेळल्या चाली

सख्ख्या भावाने बंडखोरी केल्याने माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात त्यांनी गुलमंडीवरील कार्यालयात बसून फोनवरूनच खेळी खेळली. दुपारनंतर ते विविध वाॅर्डांत पाहणीसाठी गेले. त्यांच्यावर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजप वाॅर्डांची जबाबदारी होती. त्या प्रत्येक वाॅर्डावर ते लक्ष ठेवून होते.

अन्यत्र दुर्लक्ष

मुलगा पुतण्याला उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांत आधीच नाराजी होती. त्यातच त्यांनी प्रचारात सर्वाधिक शक्ती याच दोन वाॅर्डांवर खर्च केली मतदानाच्या दिवशीही तेथेच थांबल्याने अन्य वाॅर्डांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी खासगीत बोलताना केला आहे.

तंबीही दिली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खैरे हे दोन दिवस सतत गुलमंडीवरील विविध समाज मंडळांच्या सदस्यांच्या बैठका घेत होते. यात त्यांनी शिवसेनेसोबतच राहा, अशी विनंती केली. त्यावर काहींनी तक्रारी केल्यानंतर येथून सचिनच निवडून येईल, नंतर बघून घेईन, अशी तंबीही काहींना दिल्याचे समजते. रात्री वाजेपर्यंत सुरू असलेल्या बैठकीत बंडखोर पप्पू व्यास दाखल झाले. अशी बैठक कशी घेतली जाऊ शकते, त्यांनी तक्रार करीन म्हणताच मंगळवारी रात्रीची बैठक गुंडाळण्यात आल्याचे समजते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, खासदारपुत्रासाठी समर्थनगरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठिय्या...