आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिसभेच्या 12 जागांवर उत्कर्ष, 4 ठिकाणी मंच; 18 जागांसाठी मध्यरात्रीपर्यंत मतमोजणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या निकालात संस्थाचालक, प्राचार्य आणि विद्यापीठ अध्यापक गटात राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत उत्कर्ष पॅनलने बाजी मारली. १९ पैकी सर्वाधिक १२ उमेदवार उत्कर्षचे विजयी झाले. भाजपप्रणीत विद्यापीठ विकास मंचाला जागा, तर अपक्षांनी जागांवर विजय मिळवला. महाविद्यालयीन शिक्षक मतदारसंघाच्या दहा, तर विद्या परिषदेच्या आठ जागांसाठी मात्र मध्यरात्रीपर्यंत मतमोजणी सुरू असल्यामुळे या जागांचा निकाल सोमवारी सकाळी हाती येणार आहे. 


अधिसभा विद्या परिषदेसाठी औरंगाबाद, जालना बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील २० मतदान केंद्रांवर २४ नोव्हेंबर रोजी ९७ टक्के मतदान झाले होते. रविवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणे अपेक्षित असताना विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे दुपारी बारा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणीसाठी लागणाऱ्या विद्यापीठ कर्मचाऱ्यांना आधीच प्रशिक्षण देणे गरजेचे होते. पण मतमोजणी सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे दोन तास वाया गेले. महात्मा फुले सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. पसंतीक्रमानुसार मतमोजणी असल्यामुळे मध्यरात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. या निवडणुकीत एकूण ६७ उमेदवार रिंगणात होते. ५ उमेदवार छाननीनंतरच बिनविरोध विजयी झाले होते. 


निवडून आलेले उमेदवार असे
संस्थाचालक गट

उत्कर्ष पॅनलचे राहुल म्हस्के आणि मनीषा राजेश टोपे हे दोघे बिनविरोध विजयी झाले आहेत. रविवारच्या मतमोजणीत कपिल आकात, गोविंद देशमुख विजयी ठरले. अपक्षांमध्ये संजय निंबाळकर, भाऊसाहेब राजाळेंनी विजय मिळवला. 


प्राचार्य गट
उत्कर्ष पॅनलचे डॉ. शिवदास शिरसाट, डॉ. प्राप्ती देशमुख बिनविरोध आले. डॉ. भारत खंदारे, डॉ. अली जाकीर, डॉ. अशोक पंडित, डॉ. जयसिंग देशमुख, तर विद्यापीठ विकास मंचाचे डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. रामचंद्र इप्पर (बिनविरोध), डॉ. हरिदास विधाते, डॉ. सुभाष टकले विजयी झाले आहेत. 


विद्यापीठ अध्यापक गट
उत्कर्षपॅनलचे डॉ. राम चव्हाण यांनी विक्रमी मतांनी माजी बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला. डॉ. चव्हाण यांना ९८, तर डॉ. पाटील यांना ५८ मते मिळाली. डॉ. स्मिता अवचार यांनीही विक्रमी मते घेतली. त्यांनी डॉ. वैशाली खापर्डे यांचा पराभव केला. अपक्ष डॉ. सतीश दांडगे यांनी डॉ. सुरेश गायकवाड यांचा पराभव केला.


परिवर्तन होईल 
अनेक वर्षांपासून आ. चव्हाण यांची विद्यापीठात सत्ता आहे. आता आम्हाला यश मिळाले आहे. विद्यापीठात लवकरच प्राध्यापक आणि विद्यार्थिकेंद्रित विद्यापीठ विकास मंचाचे वर्चस्व सिद्ध होईल. शंभर टक्के परिवर्तन होईल.
-डॉ.गजानन सानप, निमंत्रक, विद्यापीठ विकास मंच 


भाजपला फायदा 
केंद्र आणि राज्यातील सत्तेमुळे विद्यापीठ विकास मंचाला यश मिळाले. काही महत्त्वाच्या जागांवर उत्कर्ष पॅनल अपयशी ठरले. मात्र सायंकाळपर्यंत मिळालेल्या १२ जागा समाधानकारक आहेत. दोन अपक्षांनी मला चर्चेसाठी बोलावले आहे 
- डॉ.शिवाजी मदन, निमंत्रक, उत्कर्ष पॅनल

बातम्या आणखी आहेत...