आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वाऱ्या वाढल्या; शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी 'दिल्ली' दूरच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या १५ वर्षांची काँग्रेस आघाडीची सत्ता उलथून टाकल्यापासून शहरातील वरिष्ठ भाजप पदाधिकाऱ्यांच्या मुंबई, दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. विशेष म्हणजे यात काही नवख्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पक्षाच्या प्रमुख दहा कार्यकर्त्यांना फोन केले असता त्यातील निम्मे एक तर मुंबईत असतात किंवा त्यांच्यातील वरिष्ठ थेट दिल्लीत असल्याचे सांगतात. इकडे शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र अजूनही अस्वस्थच आहेत. कारण त्यांना सत्तेची चव चाखणे काय असते हे अजूनतरी समजले नाही. त्यांच्यासाठी दिल्ली तर सोडाच, मुंबईदेखील दूरच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जे खरे सत्ताधारी त्यांचीच मुंबई-दिल्ली वारी, असे बोलले जात आहे.

१९९९ पासून शिवसेना तसेच भाजपचे कार्यकर्ते सत्तेसाठी कायम अासुसलेले होते. एकदाची सत्ता आली अन् भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले. महत्त्वाची खातीही भाजपकडेच असल्याने वेगवेगळी कामे घेऊन शहरातील ज्येष्ठ पदाधिकारी लगेच कामाला लागले. त्यात प्रदेश सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यातील अनेकांना फोनवर विचारणा केली असता निम्म्यापेक्षाही अधिक पदाधिकारी कधी मुंबई तर कधी दिल्लीत डेरेदाखल असतात.
सत्तेत मुंबई किंवा दिल्ली वाऱ्या यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. मात्र, सत्तेतील सहभागी असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला अजूनही हे भाग्य लाभलेले नाही.

भाजप नेत्यांशी संधान
आपली कामे आपल्या पक्षाच्या मंत्र्यांकडून होत नाहीत असे दिसताच सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेतल्याचे कानी येते. त्यामुळे ओघानेच भाजप पदाधिकाऱ्यांचा अाविर्भाव काहीसा वाढल्याची चर्चा आहे.

इतर पदाधिकारी वारीत पुढे
संजय केणेकर हे बहुतांश वेळा मुंबईतच असतात. त्यानंतर सतीश नागरे, हेमंत खेडकर, ज्ञानोबा मुंडे, बस्वराज मंगरुळे, प्रवीण घुगे वारीवर असतात. यातील काही मंडळी आमदारांसोबत जातात, तर काही जण थेट मंत्र्यांकडेच जातात. यातील काहींना सोबत घेतल्याशिवाय मंत्रीही भेटत नाहीत, अशी चर्चा पक्षात असल्याची चर्चा आहे. भाजपचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यातील हरिभाऊ बागडे हे विधानसभेचे सभापती आहेत. त्यांच्याकडेही जाणाऱ्यांची रीघ कमी नाही. अतुल सावे व प्रशांत बंब हे अन्य दोन आमदारही स्वत: मुंबईत जास्त वेळ राहतात आणि आपण आमदारासोबत आहोत, असे सांगणारेही बरेच आहेत.