आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Citizens, Youths Experienced Birds Watching At Nathsagar

अथांग नाथसागरावर ज्येष्ठ, तरुणाईने अनुभवले पक्ष्यांचे अद्भुत विश्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सकाळी साडेपाचला एसएससी बोर्डासमोरील वन विभागाच्या कार्यालयात नागरिकांची गर्दी होत होती. बघता बघता शेकडो जण जमले अन् आठ ते दहा गाड्यांत बसून पक्षिप्रेमींचा प्रवास सुरू झाला. एक तासानंतर ऐतिहासिक पैठणनगरीतील जायकवाडी धरणाजवळ पोहोचताच प्रत्येकाच्या तोंडून अप्रतिम, विलक्षण, भारीच असे शब्द निघाले. सकाळचे अाल्हाददायक वातावरण, थंड वारा, सूर्याची सोनेरी किरणे, खुले विस्तीर्ण आकाश, समोर नजर जाईल तिथवर पाणी अन् कधीही पाहिलेल्या पक्ष्यांची भरलेली शाळा पाहणे, असे विहंगम दृश्य पक्षिप्रेमींनी शनिवारी पाहिले.

तिसऱ्या पक्षी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जायकवाडी येथे पक्षिप्रेमी, अभ्यासक, हौशी मंडळींनी देशी- विदेशी पक्ष्यांचे निरीक्षण केले. जायकवाडीच्या ५४ बाय २८ किमीच्या परिसरात स्थानिक पक्ष्यांखेरीज विदेशी पक्षी एका ठिकाणी पाहण्याची संधी सर्वांना मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासून लाखो किलोमीटरचा पल्ला गाठून जायकवाडीवर येणाऱ्या फ्लेमिंगोचे मात्र दर्शन दुर्मिळच होते. फ्लेमिंगोच्या थव्यांचे सौंदर्य या ठिकाणी न्याहाळण्याचा मोह छायाचित्रकारांना आवरत नाही. यंदा वातावरण बदलाचा परिणाम पक्ष्यांवर दिसून आला. सकाळी ७.४५ ते १०.४५ वाजेच्या दरम्यान पक्ष्यांच्या विश्वाची सैर तरुणाईने अनुभवली. पक्षी तज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी प्रत्येक ग्रुपजवळ जाऊन जायकवाडी जलाशयावरील पक्ष्यांचा इतिहास, सद्य:स्थिती, बदलांचे कारण, पुढील काळातील आव्हाने याविषयी माहिती देत चर्चा करत होते. डॉ. यार्दी म्हणाले, २०७ प्रजातींचे पक्षी जायकवाडीत पाहण्यास मिळतात. यापैकी ८४ स्थलांतरित पक्षी आहेत, तर ६४ जाती या देशांतर्गत आणि राज्यांतर्गत स्थलांतर करून आलेल्या आहेत. वनक्षेत्र अधिकारी मनोज कापुरे यांनी जायकवाडीच्या पाण्यात मगरी असल्याचे सांगितले. वन विभागाच्या दुर्बिणींतून पक्ष्यांचे अद््भुत विश्व आणखी जवळून पाहण्याची संधी प्रत्येकाला मिळाली. छायाचित्रकार दुपारपर्यंत कॅमेऱ्यांचे अँगल सेट करून पक्ष्यांच्या विविध हालचाली टिपत होते. नवखंडा महाविद्यालयाच्या तरुणींसह स्थानिक शाळांतील विद्यार्थीही या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉ. राजू कुसंबे, विभास अमोणकर, वन विभाग अधिकारी रत्नाकर नागापूरकर, पक्षिमित्र भूषण कुलकर्णी, रंजन देसाई उपस्थित होते.

या पक्ष्यांचे केले निरीक्षण
डौलातमान हलवत जाणारे गोल्डन डक रामायणातील सोनेरी हरणाप्रमाणे मादक होते. बदकांच्या या जोड्यांचा डौल प्रत्येकाला मोहवणारा होता. किंगफिशर, गीज, गल, हेरॉन, पोचार्ट, ओपन बिल स्टॉर्क, स्विफ्ट, स्पॉटबिल, व्हाइट आयबी, ग्लॉसी आयबी, बॅक आयबी, शेल डक, गॉडविट, वॅकटेल, शाइक आदी.

पक्षी अभ्यासक डॉ. दिलीप यार्दी यांनी शालेय विद्यार्थिनींना पक्ष्यांबद्दल माहिती दिली. जायकवाडीच्या जलाशयावर स्वच्छंद विहार करणाऱ्या पर्पल हेरॉन या पक्ष्याचे छायाचित्र हौशी छायाचित्रकार नितीन सोनवणे यांनी 'दिव्य मराठी'ला उपलब्ध करून दिले.