आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकारितेची विश्वासार्हता ढासळत असल्याची खंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सध्या माध्यमे स्थित्यंतराच्या अवस्थेतून जात आहेत. पेड न्यूज, मालकशाही, व्यापारी वर्गाचे वाढते वर्चस्व या सर्व प्रकारांमुळे प्रसार माध्यमांवर असलेली सामान्य वर्गाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे, अशी खंत पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार प्रा. विश्राम ढोले यांनी व्यक्त केली.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत सभागृहात रविवारी विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. शरद भोगले, मिलिंद पोहनेरकर, ज्येष्ठ पत्रकार शरद कारखानीस, कुलभूषण बाळशेटे यांची उपस्थिती होती. प्रा. ढोले यांच्या हस्ते कारखानीस आणि ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांना यंदाचा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानही या वेळी करण्यात आला.

प्रा. ढोले म्हणाले की, बदल हा स्थायिभाव असल्याने माध्यम क्षेत्रही मोठय़ा प्रमाणात बदलत आहे. या बदलामध्ये पेड न्यूजचे फॅडही मोठय़ा प्रमाणात आले आहे. यामुळे अंतर्गत आणि बाह्य अशी दोन्ही आव्हाने प्रसार माध्यमांसमोर आहे. पेड न्यूज हा गंभीर प्रकार आहे. यात चूक दुरुस्त करण्याची क्षमताच राहिलेली नाही. कारण मालगवर्गच त्यात उतरला आहे. हा पर्याय पत्रकारितेला उपयुक्त नाही. दुसरे आव्हान म्हणजे काम करताना किंवा रिपोर्टिंगमध्ये आपली काही जबाबदारी आहे हे विसरून सर्व बाबतीत पत्रकारासच गृहीत धरले जाते. असे असले तरी पत्रकारितेत आजही चांगले काम करणारे आणि चांगले काम करणार्‍या पत्रकारांना घाबरणारेही आहेत, अशी पुस्तीही ढोले यांनी जोडली.

पुरस्कार स्वीकारताना कारखानीस यांनी आपल्या पत्रकारितेतील अनुभव कथन करून येणारा काळ हा अधिकाधिक स्पर्धा वाढवणारा आहे. त्यात सामाजिक बांधिलकी जपत आपण देवर्षी नारद यांच्याप्रमाणे पत्रकारितेचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलभूषण बाळशेटे यांनी केले. या वेळी मोठय़ा संख्येने पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.