आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे’; मंगेश पाडगावकर यांचा सत्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या चार दशकांपासून मराठी मनावर मोहिनी घालणार्‍या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या गप्पा आणि अवीट कवितांच्या मैफलीने औरंगाबादकर रसिकांना शब्दांच्या झोपाळ्यावर झुलवले. ‘स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे’ असा अनुभव सर्वांना आला.

देवेन समूहाच्या वतीने गुरुवारी (7 मार्च) मंगेश पाडगावकर यांचा डॉ. यु. म. पठाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्याधर रिसबुड यांनी पाडगावकरांची प्रकट मुलाखत घेतली. पाडगावकरांची अजरामर गाणी आणि गप्पा असा हा कार्यक्रम रंगला. पाडगावकरांनी कवितेचा प्रवास आणि गाजलेल्या कवितांबद्दल माहीत नसलेले अनेक प्रसंग सांगितले तसेच आपल्या प्रसिद्ध कवितांचे वाचनही केले. पाडगावकर म्हणाले, वयाच्या 14 व्या वर्षी माझ्याच वयाच्या एका मुलीला पाहून मी पहिली कविता केली. ‘तुज पाहिले, तुज वाहिले, नव पुष्प हे, हृदयातले’ ही ती कविता होती.

खुसखुशीत किश्शांना दाद देणार्‍या औरंगाबादकर रसिकांचे कौतुक करताना पाडगावकर म्हणाले की, ‘वा. रा. कांत आकाशवाणीत नोकरीला असताना मी कविसंमेलनासाठी औरंगाबादला आलो होतो. त्यानंतर अनेकदा आलो. चांगल्या कलेचे, कवितेचे कौतुक करणे ही औरंगाबादकरांची खासियत आहे.’

मुलाखतीदरम्यान विश्वनाथ दाशरथे, सुस्मिरता डवाळकर, निनाद आजगावकर यांनी ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘श्रावणात घन निळा’, ‘लाजून हासणे’, ‘निज माझ्या नंदलाला रे’,‘शुक्र तारा मंद वारा’ ही अजरामर गाणी सादर केली.