आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Social Worker Dr.Prakash Amate In Aurangbad

इच्छेमुळे कठीण काम सोपे; डॉ. प्रकाश आमटे यांची नव्या पिढीला साद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कुष्ठरोगी आणि आदिवासींची सेवा करण्याचे काम अत्यंत खडतर आहे. अनेक कष्ट उपसावे लागतील हे माहित होते, पण मनाची तयारी असल्यामुळे कष्टाची जाणीवच झाली नाही. प्रबळ इच्छा आणि प्रामाणिकपणा अंगी असला तर कठीण काम सोपे बनते. सेवाव्रत राखण्याची ही गुरुकिल्ली मॅगसेसे पुरस्कारविजेते तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी दिली. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता रुक्मिणी सभागृहात‘संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि एमजीएम यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आमटे आणि भाभा राष्ट्रीय अणुसंशोधन संस्थेचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. ज्येष्ठराज जोशी यांचे व्याख्यान आणि संवाद साधण्याचा खास कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. आमटेंच्या पत्नी डॉ. मंदाताई आमटे, डॉ. जोशी यांच्या पत्नी रुजूता जोशी, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धनराज माने, प्राचार्य प्रताप बोराडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे होते.

डॉ. आमटे म्हणाले, आपली मुले सुखात आणि कुठल्याही कष्टाशिवाय राहावीत असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते. मात्र तसे बाबांना वाटले नाही. त्यांनी आपल्याला व भाऊ विकासला समाजसेवा करण्याची प्रेरणा दिली. त्यांनी दोघांचीही त्या दृष्टीने मानसिक तयारी करून घेतली. मीसुद्धा त्यांचीच परंपरा पुढे कायम करण्यासाठी माझ्या मुलांना आणि सुनांनाही समाजसेवेत गुंतवूण ठेवले आहे.

भारत ज्ञान आयात करणारा देश
95 टक्क्यांपेक्षा अधिक ज्ञान आपण विदेशातून आयात करून घेतो. त्यातच आपला वेळ आणि पैसा खर्च होत असल्याचे निष्कर्ष अमेरिकेने काढले आहेत, असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. त्यांनी केलेल्या सादरीकरणातून भारतात समाजोपयोगी संशोधन होत नसल्याचे म्हटले आहे. देशात 50 टक्के संशोधन हे विद्यापीठाने करणे अपेक्षित आहे, मात्र त्याप्रमाणे होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. माने यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन मुकूंद कुलकर्णी आणि आशा देशपांडे यांनी केले. पांढरीपांडे यांनी अध्यक्षीय समारोप केला.

अन् मंदाशी ‘लफडं’ झालं
वडिलांनी महारोगी सेवा समितीची स्थापना 1949 मध्ये केली. 1951 मध्ये आनंदवनाची निर्मिती केली. त्यानंतर डिसेंबर 1970 मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले. बाबांनी आपल्याला सरकारकडे जंगलातील जागा मिळवण्यासाठी प्रस्ताव देण्याचे सांगितले, असे नमूद करून त्यांनी सरकारच्या धोरणांवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे विधी महाविद्यालयातील बाबांचे जवळचे मित्र होते. तरीही हा प्रस्ताव मंजूर होण्यास अपेक्षेप्रमाणे दोन वर्षे उशीर झाला. या दरम्यान आंतरवासिता (इंटनर्शीप) काळ पूर्ण करताना डॉ. मंदाशी प्रेमविवाह झाला. प्रेम म्हणजे, त्याकाळात त्याला लफडं म्हणायचे. सरकारने दोन वर्षे लावले नसते, तर आपण अविवाहित राहिलो असतो, असेही त्यांनी सांगितले.