आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तम नागरीकरणासाठी चार शास्त्रांचा अभ्यास; ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव चितळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- घराचीचौकट उभी केली म्हणजे कुटुंब सुखाने नांदत आहे, असे होत नाही. मानवाला सुखी जीवन जगण्यासाठी घरासोबतच अजून बऱ्याच गरजा असतात. त्या योग्य रीतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रत्येक गाव, शहर हे उत्तम नागरीकरणाचे उदाहरण झाले पाहिजे. सामाजिकशास्त्र, अर्थशास्त्र, स्थापत्यशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या चारही शास्त्रांचा आपल्या जीवनाशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे उत्तम नागरीकरणासाठी या चारही शास्त्रांचा एकत्र अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत पुण्याचे ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी व्यक्त केले. शिवाजी महाविद्यालयात सायंकाळी झालेल्या प्रा. नी. वि. सोवनी स्मृती व्याख्यानात ते बोलत होते.
मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या 38 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सायंकाळच्या सत्रात माधव चितळे यांनी ‘नागरीकरण का कसे?’ या विषयावर विचार मांडले. विषयाचे विश्लेषण करताना त्यांनी जगभराचा प्रवास घडवला. नागरीकरण आणि महानगरीकरण हे भिन्न विषय आहेत. नागरीकरण म्हणजे लोकसंख्येचा फक्त सांख्यायिक दृष्टीने विचार करून चालत नाही. जगाचे भवितव्य ठरवणारे काही कळीचे मुद्दे आहेत. त्यांचा अभ्यास करण्यासाठी युनेस्कोने ‘वेहाब’ हा कार्यक्रम जगभर राबवत आहे. पाणी, ऊर्जा, वस्ती व्यवस्था, शेती, जीवशास्त्र विज्ञान या पाच घटकांपासून हे वेहाब तयार झाले आहे.नागरीकरण म्हणजे नुसते स्थापत्य शास्त्र नाही. चांगले घरे, चांगली रस्ते, उद्योग निर्माण केली म्हणजे उत्तम नागरीकरण होत नाही. उद्योगांचा विकास करताना पर्यावरणाला कोणत्याच प्रकारची हानी पोहोचणार नाही, या दृष्टीने कार्य होणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांच्या ‘गाव सोडुनी पक्षी शहरी घिरट्या घाली, माय असूनही माती अनाथ लेकरे झाली...’ या कवितेने उपस्थितांचे कंठ दाटले. त्यांच्या ‘गावपक्षी’ कवितेने कार्यक्रमाचा समारोप झाला. सूत्रसंचालन डॉ. मंजूषा मुतमाड यांनी केले.
खेळकरांच्या विनोदांनी केले वातावरण हलके
सकाळपासूनविविध गंभीर विषयांवर चर्चा झाल्याने महाविद्यालयीन परिसरातील वातावरणदेखील अतिशय गंभीर झाले होते. मात्र, सायंकाळी अॅड. अनंत खेळकर यांनी वातावरण हलके केले. अधिवेशनात नुसते डोक्यासाठी बौद्धिक खाद्य नव्हे, तर आनंदी, उत्साही मनासाठी विनोदाची जोड लाभली. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद बोर्डे यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. रामेश्वर भिसे यांनी केले.