आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serial Acting Means Nothing Without Job Actress Nishigandha Wad

मालिकांत अभिनय म्हणजे नोकरीशिवाय काही नाही - अभिनेत्री निशिगंधा वाड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहिन्या आणि मालिकांचे प्रस्थ वाढलेले आहे. एका मालिकेवर अनेक कुटुंब अवलंबून असतात. सध्या माझी ‘ससुराल सिमर का’ ही मालिकारूपी नोकरी सुरू आहे. मालिकांमध्ये काम करणे म्हणजे सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत नोकरीपलीकडे काहीच नाही, असे स्पष्ट मत प्रख्यात अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी व्यक्त केले. ललित कला महोत्सवाच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या शहरात आल्या असताना ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधून अभिनय क्षेत्रातील घडामोडी, वास्तव जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न त्यांच्याच शब्दांत..
मी सध्या ‘सूर्या’ आणि ‘मला आई पाहिजे’ या चित्रपटांत मिलिंद गुणाजीसोबत काम करत आहे. ‘किंजल’ हा स्त्रीशक्तीवर आधारित चित्रपटही लवकरच सुरू होतोय, तर हिंदीमध्ये विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘भाग जॉनी’ नावाचा चित्रपट कुणाल खेमूंसोबत करीत आहे. याचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. आजवर 16 हिंदी चित्रपटांतून तर 135 मराठी चित्रपटांतून काम केल्याचे समाधान आहे. वयाच्या 19 व्या वर्षापासून मी काम करतेय. बालवयातच घेतलेला ठाम निर्णय योग्य ठरला याचे सुख लाभतेच.
आता मराठीच्या कक्षा रुंदावल्या : पूर्वी लाटेवर स्वार चित्रपट जास्त आणि आशयघन, समृद्ध चित्रपट मोजकेच निर्मित व्हायचे. आता दमदार विषय जास्त आणि लाटेवर स्वार एखादाच चित्रपट असतो. याला कारण म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि विकसित तंत्रज्ञान आहे. आता काळ, विचारांच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. निर्मातेही अंतर्मुख करणार्‍या कलाकृतींवर पैसे लावायला तयार आहेत. पूर्वी माहेरची साडी आली, त्यानंतर तो पदर फाटेपर्यंत त्याच विषयावर चित्रपट आले, पण आता ते दिवस उरले नाहीत. जागतिक स्तरावर मराठी चित्रपटांची दखल घेतली जात आहे, यामुळेही हा बदल घडला आहे. आता मास आणि क्लासचे विभाजन पुसट झाले आहे, हासुद्धा चांगला बदल आहे.
हा माझ्या सुखाचा भाग
मी सध्या दोन पीएचडी मिळवल्या आहेत. शांताबाई शेळकेंच्या कवितांवर संशोधन करून तिसरी डिग्री मिळवण्याची वाटचाल सुरू आहे. शिवाय ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर ठिकठिकाणी व्याख्यानांसाठी जातेय. कारण तो माझ्या सुखाचा भाग आहे. समाजासाठी आपले योगदान असावे, त्यानेच मी समाधानी होते.