आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेतू’त विद्यार्थी-पालकांची कोंडी, यंत्रणा नसल्याने विद्यार्थ्यांना घ्यावी लागते खासगी केंद्रात धाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातील यंत्रणा नेमक्या दहावी आणि बारावीच्या निकालानंतर कोलमडल्याने गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी तसेच पालकांची तारांबळ होत आहे. त्यामुळे आपसूकच दलालांची चलती सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे नातेवाईक तसेच पाल्य आता येथे काम पाहत असल्याने अधिकारीही येथील कामकाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताना दहावी आणि बारावीनंतर उत्पन्न, जात, रहिवासी, भूमिहीन अशा वेगवेगळ्या प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. नेमके याच काळात येथील यंत्रणा कोलमडली आहे. २६ जूनला दहावीचा, तर त्याआधी २५ मे या दिवशी बारावीचा निकाल लागला. निकालानंतर विद्यार्थ्यांनी कागदपत्रे सादर करून अजूनही अनेकांना प्रमाणपत्रे मिळू शकलेली नाही.

सेतू सुविधा केंद्र चालवण्याचे पहिले कंत्राट संपल्यापासून हा प्रकार सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत सेतू सुविधा केंद्र हे दलालांकडे जाऊ देणार नाही आणि लवकरच येथील सर्व यंत्रणा कार्यान्वित होईल, असे आदेश एक महिन्यापूर्वी पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले होते; परंतु त्यानंतरही काही होऊ शकले नाही. त्यामुळे आजघडीला पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेली कोणतीही कागदपत्रे काढण्यासाठी गेलात, तर तेथे मोठी रांग दिसेल. त्यात तुमच्याकडून कागदपत्रे सादर करून घेतली, तर किमान २० दिवसांनंतर प्रमाणपत्र मिळेल, असे सांगण्यात येते. २० दिवसांनी गेलात तर अजून सह्या झालेल्या नाहीत, असे उत्तर मिळते.

माझ्याकडे तक्रारी नाहीत
सेतू सुविधा केंद्राबद्दल माझ्याकडे फारशा तक्रारी नाहीत. तुम्ही म्हणत असाल तर मी बघतो अन् केंद्राचे कामकाज सुरळीत चालवण्यावर भर देतो. तेथे काम करणारे कर्मचारी कोणाचे नातेवाईक आहेत की पाल्य, याची मला माहिती नाही. -पी. एल. सोरमारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी.

संघटनेने केले हात वर
हाविषय आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगून राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दत्तात्रय एम. देशपांडे यांनी हात वर केले. प्रत्यक्षात त्यांच्याच संघटनेचे पदाधिकारी तथा सदस्यांचे नातेवाईक येथे कामास असल्याचे समजते.

मुलांचा भरणा झाल्याने गोंधळ
सेतूसुविधा केंद्र चालवण्याचा करार संपुष्टात आल्यानंतर नवीन ठेकेदार नियुक्त करण्याचे पुढे ढकलण्यात आले. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता केंद्र चालवण्यासाठी निविदा काढता ते प्रशासनामार्फत खासगी कर्मचारी नेमून चालवण्याचा निर्णय झाला. या ठिकाणी काम करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या पाल्य तसेच नातेवाइकांना स्थान देण्यात आले. त्यांना या कामाचा अनुभव नाही आणि दुसरे म्हणजे ते दुसऱ्या अधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत.
बातम्या आणखी आहेत...