आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Setu Suvidha Certificate Home Delivery Aurangabad

सेतूची प्रमाणपत्रे आता घरपोच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सेतू सुविधा केंद्रातील गर्दी कमी करण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना सुविधा व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूच्या केंद्रातून मिळणारी सर्व प्रमाणपत्रे घरपोच देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. गुरुवारपासून (20 जून) ही सुविधा सुरू होणार असून त्यासाठी सर्व तयारी झाली असल्याचे सेतू सुविधा समितीच्या सचिव तथा उपजिल्हाधिकारी सरिता सूत्रावे यांनी स्पष्ट केले.

या सुविधेसाठी 10 अतिरिक्त कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेतू केंद्रात कागदपत्रे सादर केल्यानंतर प्रमाणपत्र मिळण्यासाठी लागणा-या कालावधीतच ही प्रमाणपत्रे आपल्या घरी मिळणार असून एका प्रमाणपत्रासाठी जास्तीचे 50 रुपये मोजावे लागतील. म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र घ्यायचे असल्यास सेतूत ते 50 तर घरपोच 100 रुपयांत मिळेल.

काय करावे लागेल ?
0240-2010060 या क्रमांकावर फोन करावा. विशिष्ट प्रमाणपत्रासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे, याची विचारणा करावी. घरचा पत्ता दिल्यानंतर कर्मचारी घरी येईल. सर्व कागदपत्रे घेऊन प्रमाणपत्रासाठी लागणारे शुल्क आकारून घरपोच सेवेसाठी अतिरिक्त 50 रुपयांचे शुल्क घेतले जातील. त्याची रीतसर पावतीही जागेवरच दिली जाईल. विशेष म्हणजे कर्मचा-याला एकदा घरी बोलावून तीन किंवा चार प्रमाणपत्रांसाठी कागदपत्रे सोपवली तरीही 50 रुपये एवढेच शुल्क लागेल. म्हणजेच एकदा घरी येण्यासाठीचे 50 रुपये शुल्क आहे.

ही प्रमाणपत्रे मिळतील घरपोच : रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर, राष्ट्रीयत्व, रहिवासी प्रमाणपत्र

10 कर्मचा-यांची नियुक्ती
गुरुवारपासून ही सेवा सुरू होत असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात 10 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रतिसाद चांगला मिळाला तर ही संख्या वाढववण्यात येईल. - सरिता सूत्रावे, उपजिल्हाधिकारी, सेतू सुविधा समिती.