आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाई येथून चोरट्यांची आयात, औरंगाबादेत घरफोडी, 7 जण अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादेतील घरफोडीसाठी अंबाजोगाई येथून चोरट्यांना बोलावण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. दशमेशनगर येथे १४, १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या दोन घरफोड्यांचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने सात जणांना अटक केली. त्यांच्या कबुलीजबाबातून हे सत्य समोर आले.

१४ ऑक्टोबर रोजी दशमेशनगर येथील शांतगंगा अपार्टमेंटमधील रहिवासी, आर्किटेक्ट दिब्येंदू मुखर्जी यांच्या घरात सेल्समनच्या वेशात चोरटे घुसले. त्यांना मारहाण करत सुमारे पाच लाखांचा ऐवज लुटला. दुसऱ्या दिवशी शांतगंगा अपार्टमेंटपासून दहा फुटांवर असलेल्या मिश्रीलाल बरडिया यांना लुटण्यात आले. गेल्या महिनाभरापासून उस्मानपुरा पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक या चोरट्यांच्या शोध घेत होते. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाला या चोरांचा सुगावा लागला आणि ३७ व्या दिवशी त्यांना अटक करण्यात आली. गजाआड करण्यात आलेले सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर बलात्कार, मंगळसूत्र चोरी आणि घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, बरडिया यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीचा नवरा विनोद गायकवाड दोन्ही लुटींचा मास्टरमाइंड आहे. तो याच भागात वॉचमन होता. त्याने दहा ते १२ ऑक्टोबर कालावधीत औरंगाबादेतील काही चोरट्यांशी संपर्क साधून दिब्येंदू मुखर्जींचा घराची इत्यंभूत माहिती दिली. त्याआधारे चोरट्यांनी लूट केली. त्याचवेळी त्याने बरडियांच्या घरात पहाटे चोरी करण्याचाही प्लॅन दिला होता. पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे विनोदने अंबाजोगाई येथील गँगला निमंत्रित केले. इंडिका कारने तेथील सराईत चोरटे १४ ऑक्टोबर रोजीच शहरात आले. मात्र, बरडियांच्या बंगल्याजवळ खूपच वर्दळ असल्याने नकार देऊन ते अंबाजोगाईकडे परत निघाले. ते शहागडपर्यंत पोहोचले असताना विनोदने त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधून खूप विनवणी केली. बरडिया घरात एकटेच असतात. त्यामुळे कोणताही धोका होणार नाही, असे त्यांना पटवून दिल्यावर चोरटे परतले आणि १५ रोजी पहाटे चारच्या सुमारास त्यांनी बरडियांना चाकूचा धाक दाखवून सुमारे पाच लाखांचा ऐवज पळवला. अंबाजोगाईच्या टोळीत नंदू शिरसाठ, सुनिल पवार, गोरख खळेकर, सूर्यकांत श्रीराम मुळे, राजु कळसे, पांडू कचरे हे चोरटे होते.