औरंगाबाद- लोक सहभागातून चौक, वाहतूक बेटांच्या सुशोभीकरणाची मनपाने घोषणा केल्यानंतर सात बँका काही खासगी कंपन्या, संस्था या कामांसाठी पुढे आल्या आहेत. पाच चौकांचे काम आठवडाभरात सुरू होणार आहे. हे काम करणाऱ्यांना मनपाकडून कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रस्ताव आराखड्याला चोवीस तासांत मंजुरी देण्यात येणार आहे.
मनपात आज महापौर त्र्यंबक तुपे यांनी चौक सुशोभीकरणाची तयारी दर्शवणाऱ्या सात बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात उपमहापौर प्रमोद राठोड, विरोधी पक्षनेते जहांगीर खान, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, उद्यान निरीक्षक विजय पाटील यांची उपस्थिती होती. बैठकीत बँक अधिकाऱ्यांनी सहभागाची तयारी दर्शवताना मनपाची मंजुरी आणि इतर बाबींवरही महापौरांसोबत चर्चा केली.
बैठकीनंतर बोलताना महापौर उपमहापौरांनी सांगितले की, एनकेजीएसबी सहकारी बँक, येस बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, युनियन बँक, एचडीएफसी बँक देवगिरी नागरी सहकारी बँक यांनी रस्ते चौकांच्या सुशोभीकरणाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. याशिवाय काही खासगी कंपन्या बिल्डरही पुढे आले आहेत. ट्री गार्ड, रेलिंग्ज तयार करून देणे चौकांचे सुशोभीकरण आदी कामे या सर्वांच्या सहकार्याने केली जाणार आहेत.
मनपा लावणार दहा हजार झाडे
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मनपाच्या वतीने जूनपासून वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. मनपा वर्षभरात १० हजार झाडे लावणार असून ते जगवण्यासाठी त्या त्या भागातील नागरिक, व्यापारी, संस्थांना सहभागी करून घेतले जाणार आहे. उद्याने, रस्त्यांच्या दुतर्फा, शाळा, मनपाच्या खुल्या जागा, स्मशानभूमी, कब्रस्तान, हरित पट्टे येथे ही झाडे लावली जातील. याशिवाय प्रत्येक वाॅर्डात नगरसेवक, नागरिक संस्थांच्या मागणीनुसार झाडे लावली जाणार आहेत. मनपात नव्याने समाविष्ट झालेल्या साताऱ्यातील डोंगराच्या पायथ्याशी परिसरात झाडे लावली जाणार असून त्यासाठी खड्डे करण्याचे कामही सुरू झाले आहे. पाऊस आलेला नसल्याने पहिल्या टप्प्यात ४०० झाडे लावली जातील नंतर टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण केले जाणार आहे, असे महापौरांनी सांगितले.
आठवडाभरात प्रारंभ
शहरातील गजानन महाराज मंदिर चौक, कामगार चौक, उस्मानपुरा चौक यासह एकूण पाच चौकांच्या सुशोभीकरणाचे काम आठवडाभरात सुरू होणार असून त्यासाठी संबंधितांनी तेथे करावयाच्या सुशोभीकरणाचा आराखडा सादर केल्यानंतर चोवीस तासांच्या आत मंजुरी देण्यात येईल, असेही महापौर म्हणाले.
अनेकजण इच्छुक
महापौर, उपमहापौर म्हणाले की, बँकांशिवाय अनेक बिल्डर, उद्योजक कोचिंग क्लासेस यांनी या शहर सुशोभीकरणाच्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना किमान पाच वर्षांसाठी हे रस्ते अथवा चौक अथवा वाहतूक बेट सौंदर्यीकरण देखभालीसाठी दिले जाणार आहे. उद्योजक सचिन मुळे यांच्या सान्या मोटर्स या फर्मच्या वतीने बनेवाडी स्मशानभूमी विकसित केली जाणार असून ते दहा वर्षे हे काम सांभाळणार असल्याचे महापौर म्हणाले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोणतील आहेत प्रमुख कामे...