आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक अस्पष्टतेचे आणखी नऊ रुग्ण; रुग्णांनी दर्शवली उपचारांची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुलगी म्हणून 15 वर्षे जगलेल्या हसरूल येथील रुग्णाला बालरोग शल्यचिकित्सक डॉ. संदीप हंबर्डे यांनी शस्त्रक्रियेद्वारे मुलगा बनवल्याचे जाहीर होताच डॉ. हंबर्डे यांच्याकडे ‘अशाच’ आणखी नऊ रुग्णांनी उपचारासाठी नाव नोंदणी केली आहे.
बजरंग चौकातील बालरोग शल्यविशारद डॉ. हंबर्डे यांनी किशोरवयीन रुग्णाच्या पोटात दडलेले लिंग बाहेर काढले. त्यामुळे 15 वर्षांनंतर ‘ती’ चा ‘तो’ झाला. यासंबंधीचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने 26 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले. या बातमीचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत. या विचित्र समस्येने ग्रस्त असलेले रुग्ण डॉ. हंबर्डे यांच्याकडे येत आहेत. आतापर्यंत नऊ रुग्णांनी उपचारासाठी नावे नोंदवली आहेत. अधिक लोकसंख्येच्या जिल्ह्यांमध्ये किमान पाचशे रुग्णांना या समस्येने ग्रासले असल्याचे डॉ. हंबर्डे यांनी सांगितले.
जालना, परभणी, नाशिक, नांदेडमध्ये रुग्ण
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील बालक अशाच समस्येने ग्रस्त आहे. औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील रुग्णांचाही समावेश आहे. वाळूज येथील दीडवर्षीय दोन जुळ्यांपैकी एक मुलगा तर एक मुलगी आहे. दोन्ही अपत्यांची वाढ माता-पित्यांनी मुलगा म्हणून केलेली असून त्यांच्या लिंगातही अशाच विचित्र समस्या आढळल्या आहेत. दोन्ही मुलांना मुलगी करावे लागणार असल्याचे डॉ. हंबर्डे यांनी म्हणाले. शहरानजीकच्या एका उच्चभ्रू वसाहतीमध्येही एक रुग्ण आहे. रुग्ण आणि त्याच्या आई-वडिलांनी बातमी वाचून डॉ. हंबर्डे यांचे हॉस्पिटल गाठले आणि आपल्या अपत्याच्या लैंगिक समस्येचे निराकरण करून घेण्याची तयारी दर्शवली. त्यात परभणी जिल्ह्यातील जिंतूर, नाशिक, नांदेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. धुळ्यातील सख्ख्या बहीण-भावांनाही उपचार घ्यावे लागणार आहेत.
‘दिव्य मराठी’मुळे कोंडी फुटली !
लैंगिक समस्यांनी ग्रासलेल्या बालरुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे जवळच्या नातेवाइकांत विवाह करण्याचे प्रमाण वाढणे. लैंगिक अस्पष्टता ही जागतिक समस्या असून भारतामध्येही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. भयगंडामुळे कुणी पुढे येण्यास धजावत नाही, पण ‘दिव्य मराठी’ने कोंडी फोडल्यामुळे माझ्याच रुग्णालयात नऊ रुग्णांनी उपचारांसाठी नाव नोंदवले.
- डॉ.संदीप हंबर्डे, बालरोग शल्यविशारद