आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shantigiri Maharaj News In Marathi, Aurangabad Lok Sabha Constituncy, Divya Marathi

देव, धर्म, देश, संस्कृती मानणार्‍या उमेदवाराच्या पाठीशी,शांतीगिरी महाराजांची भूमिका स्पष्‍ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - गत लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून दीड लाख मते घेणार्‍या शांतीगिरी महाराजांची मते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी गल्ली ते दिल्ली सर्वच पक्ष व उमेदवारांनी प्रयत्न केले. परंतु कोणालाही महाराजांनी पाठिंबा दर्शवला नाही. गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला वैयक्तिक कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचे सांगितले. जो उमेदवार देव, देश व धर्म या तिन्ही गोष्टींची सांगड घालून समाजकार्य करील आणि शुद्ध शाकाहारी तसेच गोहत्याविरोधी राहील अशा उमेदवाराला मते द्यावीत, असे सांगत कोणालाही स्पष्ट पाठिंबा दर्शवला नाही. एकूण लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतीगिरी महाराजांनी पत्रपरिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी सामान्यांमध्ये ते कोणाच्या पाठीशी आहेत याविषयी संभ्रम कायम असल्याची चर्चा राजकीय वतरुळात होती.
ते पुढे म्हणाले की, धर्मसत्ता व राजसत्ता एकत्रित ठेवणार्‍या उमेदवाराला निवडावे. यावर तुमचा खासदार खैरेंना पाठिंबा आहे का? असे विचारले असता ते म्हणाले, आमचा वैयक्तिक कोणालाही पाठिंबा नाही. मतमोजणी झाल्यावरच विजयी उमेदवारावरून आमचा कोणाला पाठिंबा होता ते समोर येईल. आपण कोणत्याही एका उमेदवार किंवा पक्षाला पाठिंबा देणार होतात, परंतु सुदर्शन चॅनलच्या चेअरमनच्या मध्यस्थीने तुमच्यात व खैरेंमध्ये दिलजमाई झाल्याने तुम्ही निर्णय बदलल्याची चर्चा आहे. यावर महाराज म्हणाले, आम्ही कोणाच्याही दबावात किंवा मध्यस्थीने नव्हे, तर देशहित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला सुदर्शन चॅनलचे चेअरमन सुरेश चव्हाणके, विश्वस्त राजेंद्र पवार, सतीश वहाडणे, रत्नाकर कुलकर्णी, शेकनाथ दादा होळकर, जनार्दन रोठे, जनार्दन अधाने, राजेंद्र चव्हाण, गणेश बोराडे, भिकन आव्हाड आदींची उपस्थिती होती.
व्होट फॉर नेशन अभियान राबवणार
देशभरातील मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे व योग्य उमेदवारास निवडून द्यावे, यासाठी जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीने देशभरात व्होट फॉर नेशन हे अभियान राबवणार असल्याचे स्पष्ट केले.
नाव वापरू नये
आम्ही कोणत्याही एका उमेदवाराला किंवा पक्षाला पाठिंबा दिला नसल्याने कोणीही आमचे नाव वापरून मते मागू नये, अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे महाराजांनी सांगितले.