आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shantigiri Maharaj News In Marathi, Verul Math, Lok Sabha Election, Divya Marathi

शांतीगिरी महाराजांचे आशीर्वाद कोणाला मिळणार?, गुरूवारी जाहीर करणार भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एकदा राजकारणात आलेला माणूस सहजासहजी बाहेर पडू शकत नाही, याचा प्रत्यय वेरूळ मठाचे शांतीगिरी महाराज यांच्या निमित्ताने येतोय. गतवर्षी लोकसभेत पराभव पत्करावा लागल्यानंतर पुन्हा राजकारण नाहीच, असे सांगत बाजूला झालेले शांतीगिरी लोकसभा निवडणूक येताच पुन्हा सक्रिय झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे ते मनसेकडून लढणार अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, या वेळी त्यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला असून ते शिवसेनेला पाठिंबा देणार की काँग्रेसला हे अजून स्पष्ट झालेले नाही. शांतीगिरी महाराजांच्या या मौनव्रतामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सध्या अशांती पसरली आहे.


दरम्यान उद्या, गुरुवारच्या मुहूर्तावर शांतीगिरी महाराज मौन सोडणार असून अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय विष्णू महाराज यांनी सांगितले. बाबाजींच्या मनात काय चालले आहे हे कोणालाही माहिती नाही, त्यांच्या निकटवर्तीयांनीही काही सांगितले नाही. काय निर्णय घ्यायचा तो बाबाजींनीच घ्यायचा, असे शिष्यांनी त्यांना सांगितले असून जो काय निर्णय असेल, तो गुरुवारी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बाबाजी सांगतील त्यांना अनुयायांचे मतदान होईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बाबाजींच्या मनात काय, याची उत्सुकता लागली आहे.


10 दिवसांपूर्वी काँग्रेस उमेदवार नितीन पाटील यांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतली. महाराजांचा आशीर्वाद माझ्याच पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी सेना उमेदवार चंद्रकांत खैरे मठात दाखल झाले. त्यांनाही बाबाजींचा आशीर्वाद मिळाला. त्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. तो अजूनही कायम असून गुरुवारी तो दूर होणार आहे.


पत्रकार परिषद रामकृष्ण पाटील यांच्यासोबत?
माजी खासदार रामकृष्णबाबा यांनी 10 एप्रिलला आपली भूमिका जाहीर करणार, असे सांगितले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बाबा एकत्रितपणे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.