आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येळगंगा नदीच्या जीर्णोद्धारातून होईल शेतकऱ्यांची प्रगती शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येळगंगानदीच्या जीर्णोद्धारातून वेरुळ आणि परिसरातील १८ गावांच्या शेतकऱ्यांची प्रगती होईल, असा आत्मविश्वास श्री महामंडलेश्वर १००८ शांतीगिरी महाराजांनी व्यक्त केला. गेल्या वर्षभरापासून या नदीचे पात्र खोल, रुंद करण्याची मोहीम सुरू असून ती आता अंतिम टप्प्यात आल्याचेही ते म्हणाले. ‘दिव्य मराठी’ कार्यालयास त्यांनी मंगळवारी (९ जून) सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी येळगंगा जीर्णोद्धार मोहिमेशिवाय अन्य मुद्यांवर बातचित केली. दिव्य मराठीचे संपादक (महाराष्ट्र) प्रशांत दीक्षित यांनी महाराजांचे स्वागत केले.
महाराज म्हणाले की, वेरूळ आणि लगतच्या भागातून जाणाऱ्या येळगंगा नदीवर हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे. आणि दरवर्षी होत असलेला अत्यल्प पाऊस लक्षात घेता या नदीचे पात्र खोल, रुंद करणे अत्यावश्यकच होते. नदी पात्रात बंधारे बांधून पाणी अडवणे गरजेचे होते. त्यासाठी सरकारकडे प्रस्ताव मांडण्याऐवजी भक्त परिवाराच्या मदतीने आपणच हा प्रकल्प का हाती घेऊ नये, असा विचार मनात आला. तो व्यक्त केल्यावर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिव्य मराठीनेही यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. एवढेच नव्हे तर या अभियानात सक्रिय सहभागही घेतला. त्यामुळे ही मोहीम यशस्वी होण्याच्या टप्प्यात आहे. आता चांगला पाऊस झाला तर नदी पात्राच्यालगत आणि आसपासच्या परिसरातील सुमारे १८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पुढे होणारे फायदे लक्षात आणून दिल्यावर त्यांनीही जमीन उपलब्ध करून दिली, असेही महाराज म्हणाले. या वेळी प्रवक्ते विष्णू महाराज, के. बी. भामरे, प्रसिद्धिप्रमुख राजेंद्र पवार, झुंबरसेठ मोडके, महेश चव्हाण, मझहर खान, मनोहर गावंडे, वैभव किरगत आदींची उपस्थिती होती.

देशाचे नाव भारतच का नाही?
इतरसर्व देशांची मूळ नावे इंग्रजीतही कायम ठेवली आहेत. भारताला मात्र इंग्रजीत इंडिया का म्हटले जाते, असा सवाल महाराजांनी केला. भारताचे नाव इंग्रजीतही भारतच राहावे, असा आग्रह सर्व भारतीयांनी धरला पाहिजे नव्हे तसा बदल करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र, मराठवाडा ही संतांची भूमी आहे. जनार्दन स्वामी याच भूमीतील आहेत. त्यामुळे चिकलठाणा विमानतळाचे संत जनार्दन स्वामी विमानतळ असे करावे, अशी मागणी त्यांनी केली.

अंधश्रद्धेला थारा नाही
महाराजांकडेअंधश्रद्धेला मुळीच थारा नाही. बोकडांचा बळी देणे, लिंबू उतरवणे अशा अंधश्रद्धांना महाराज कडाडून विरोध करतात. तसा संदेशही भक्तांना देतात. भक्त परिवारातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, अशीही माहिती देण्यात आली.

श्री महामंडलेश्वर १००८ शांतीगिरी महाराज यांनी दिव्य मराठीचे संपादक (महाराष्ट्र) प्रशांत दीक्षित यांना िदव्य मराठी परिवारासाठी जनार्दन स्वामींची प्रतिमा भेट िदली. (बाजूच्या छायाचित्रात) महाराजांना दिव्य मराठीतर्फे गणरायाची प्रतिमा भेट देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...