आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहेबांनी अव्हेरले कार्यकर्त्यांचे हारतुरे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जालना येथील दुष्काळ आढावा बैठक आटोपून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे रविवारी ( 10 फेब्रुवारी) रात्री सुभेदारी गेस्टहाऊसवर आगमन झाले. पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी रात्री पावणेअकरा वाजता सुभेदारीवर मोठी गर्दी केली होती. मात्र कुणाचेही हारतुरे न स्वीकारता पवार थेट शयनकक्षात गेले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी ‘साहेब खूप थकले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सकाळी यावे,’ असा निरोप दिल्यानंतर सुभेदारीने मोकळा श्वास घेतला.

औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात सोमवार, 11 फेब्रुवारीला आयोजित दुष्काळ आढावा बैठकीसाठी पवार शहरात दाखल झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर होते. पवारांच्या स्वागतासाठी रात्री पावणेअकरा वाजेपर्यंत कार्यकर्ते थांबले होते. स्वागतासाठी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, विनोद पाटील, नगरसेवक अभिजित देशमुख, आमदार संजय वाघचोरे, उरूजभाई आदी मुख्य प्रवेशद्वारावर थांबले होते.

स्वागतासाठी खल : साहेबांचे पुष्पहार घालून स्वागत करावे की नाही, यावर पदाधिकार्‍यांनी बराच वेळ खल केला. मध्येच एका कार्यकर्त्याने खबर आणली, चिकलठाण्यात फटाके वाजवून साहेबांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे आपण पुष्पहार घालून स्वागत करण्यास काहीच हरकत नाही. अखेर जिल्हाध्यक्ष सोनवणे व विनोद पाटील यांनी साहेबांना केवळ गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याचा निर्णय घेतला.

पोलिस आयुक्त म्हणाले, साहेब नाराज होतील : जालना येथे कार्यकर्त्यांनी बेशिस्तपणाचे प्रदर्शन केल्याने साहेब नाराज झाले, असे पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी सांगितल्यामुळे कार्यकर्त्यांनी रेटारेटी न करता रांग लावून शिस्तीत स्वागत केले. सुभेदारीच्या डायनिंग हॉलमध्ये मोठय़ा संख्येने कार्यकर्ते हारतुरे घेऊन थांबले होते. साहेब खूप थकले असून, सकाळी भेटणार असल्याचा निरोप उच्च व तंत्रशिक्षणमंत्री टोपे यांनी दिल्यानंतर पुष्पगुच्छ घेऊन उभे असलेले कार्यकर्ते माघारी परतले.

शहर विकासासाठी मागणार पाच कोटी

औरंगाबाद - महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट आहे. यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासास खीळ बसत आहे. शासनाने विशेष बाब म्हणून पालिकेला पाच कोटी रुपयांचा निधी मिळवून द्यावा, यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना साकडे घालणार आहे. दुष्काळी स्थितीबाबत लोकप्रतिनिधी, अधिकार्‍यांसोबत शरद पवार सोमवारी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. या वेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक पाच कोटींच्या मागणीचे निवेदन देणार आहेत. शहरातील ज्या भागात जलवाहिन्या पोहोचलेल्या नाहीत, तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित देशमुख यांनी दिली.