आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशवंतराव चव्हाणांनी सत्तेचा कधीच दुरुपयोग केला नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - १९४६पासून अखेरच्या क्षणापर्यंत सत्तेत राहूनही यशवंतराव चव्हाण यांनी कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही. निधनानंतर त्यांची स्थावर जंगम मालमत्ता फक्त ८७ हजार रुपयांची होती. सार्वजनिक जीवनात त्यांनी फक्त देशाची सेवा केली. संकटसमयी संकटमोचकाचीच भूमिका त्यांनी निभावली, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले. मसापमधील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे पवार यांच्या हस्ते सोमवारी (४ मे) अनावरण झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योजक मधुकरराव मुळे होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, फ. मुं. शिंदे, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, डॉ. सुधीर रसाळ, प्राचार्य रा. रं. बोराडे, कुंडलिक अतकरे, दादा गोरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

चळवळी तयोगदान
पवारम्हणाले, यशवंतरावांचे शिक्षण आईने काबाडकष्ट करून पूर्ण केले. सार्वजनिक जीवनात उडी घेण्यापूर्वी सामाजिक स्वातंत्र्य की राजकीय स्वातंत्र्य आधी, यावर वाद होता. यशवंतरावांनी मात्र राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेतली. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. रिपब्लिकन पक्षाचे दादासाहेब गायकवाड यांना सत्तेत सहभागी करून त्यांनी सामाजिक जाणिवेचीही चुणूक दाखवून दिली होती. एमआयडीसी, एसटी, एमएफसी आदी विभागांची त्यांनीच निर्मिती केली. दूरदृष्टी असलेला विकासाची कास धरणारा नेता म्हणून त्यांचा सतत उल्लेख होत राहील.

एमआयएम हा वर्ष-दोन वर्षांचा ट्रेंड
औरंगाबाद शहरात नव्याने दाखल झालेल्या एमआयएम या पक्षाने धुमाकूळ घातला असला तरी हा पक्ष येथे कायमचा राहू शकत नाही, तो एक-दोन वर्षांचा ट्रेंड असल्याचे भाष्य माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ज्या निकषावर या पक्षाने शहरात प्रवेश केला त्यावर हा पक्ष जास्त वेळ टिकू शकत नाही. एक-दोन वर्षे हा ट्रेंड राहील. त्यानंतर पुन्हा विकासाचा मुद्दा समोर येईल आणि हा पक्ष संपेल. एमआयएम हा पक्ष शहरात आल्याचा फायदा हा शिवसेनेलाच झाला. त्यामुळे विकासाचा मुद्दा बाजूला राहिला. या पक्षाच्या प्रवेशाने नागरिकांचा काय फायदा झाला, असा प्रश्न करून ते म्हणाले, राजकारणात असे फेजेस येत राहतात. एमआयएम हा वर्ष-दोन वर्षे राहील, त्यानंतर पुन्हा नागरिक विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात राज्यात सत्ता मिळवली. पण अच्छे दिनचे काय झाले, याचे उत्तर आता नागरिकांना मिळू लागले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

नेहरूंचा फोन अन् चव्हाणांचे उत्तर
तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांची हकालपट्टी करून नेहरूंनी चव्हाण यांना फोन करून संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले होते. मात्र ही गोष्ट कुणालाही सांगता दिल्लीला येण्याचे सुचवले. चव्हाण यांनी मात्र हा शब्द मी पाळू शकत नसल्याचे विनम्रपणे सांगत पत्नी वेणू सतत आजारी असते, त्यामुळे पत्नीला मला सांगावेच लागेल असे म्हटल्यावर नेहरू खळखळून हसले, हा किस्सा पवारांनी सांगितला. प्रा. राजेश सरकटे यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे स्फूर्तिगीत गायले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी केले. सूत्रसंचालन दादा गोरे यांनी केले, तर कुंडलिक अतकरे यांनी आभार मानले.

(फोटो : यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.)