आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील खासदारांना दुष्काळाचे नाही सोयरसुतक; कृषिमंत्र्यांच्या बैठकीला दांडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार रविवारपासून मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. सोमवारी त्यांच्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीला मराठवाड्यातील सहा खासदारांनी दांडी मारली. यामुळे लोकप्रतिनिधींना दुष्काळाची किती चिंता आहे, हे उघड झाल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत.

केंद्रीय कृषिमंत्री पवार यांनी रविवारी दुष्काळग्रस्त जालना जिल्ह्याचा दौरा केला. महिन्यातून एक दिवस पाणी मिळणा-या जालना जिल्ह्याची दारून परिस्थिती पाहिल्यानंतर सोमवारी त्यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत मराठवाड्यातील खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. या बैठकीच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या पदरात काही पाडून घेण्याची संधी खासदारांना होती. मात्र, त्यांनी या बैठकीकडे दुर्लक्ष करुन दुष्काळाबाबत त्यांचा काय दृष्टीकोन आहे, हे सर्वांसमोर आले आहे.

मराठवाड्याच्या सहा खासदारांनी या बैठकीला दांडी मारली. त्यात जालन्याचे रावसाहेब दानवे (भाजप), बीडचे गोपीनाथ मुंडे (भाजप), नांदेडचे भास्करराव पाटील-खतगावकर (काँग्रेस), लातूरचे जयंत आवळे (काँग्रेस), परभणीचे गणेश दुधगावकर (शिवसेना), हिंगोलीचे सुभाष वानखेडे (शिवसेना) यांचा समावेश आहे. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, उस्मानाबादचे खासदार पद्मसिंह पाटील आणि राज्यसभेच्या सदस्या रजनीताई पाटील या बैठकीस उपस्थित होत्या.
(छायाचित्र - मराठवाड्यातील टंचाई परिस्थितीची आढावा बैठक)