आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी आले पवार, नंतर जमले उमेदवार; जालना, औरंगाबादला प्रचार सभांचा धडाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नेहमी माध्यमांना कार्यक्रमापुरते भेटणारे राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी निवडणूक जाहीर होताच कामाच्या स्वरूपात बदल केला आहे. केंद्रात असताना माध्यमे वारांच्या मागावर असायची, परंतु जेव्हा निवडणुका घोषित झाल्या तेव्हा कुठल्याही माध्यमाच्या प्रतिनिधीस टाळायचे नाही हे पवारांचे धोरण आहे. गुरुवारी औरंगाबादेत पवार पत्रकार परिषदेसाठी वेळेवर उपस्थित झाले. मात्र औरंगाबाद पूर्व, मध्य व पश्चिमचे राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र उशिरा हजर झाले.
पवार यांनी मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ जालना येथून केला. बदनापूर, घनसावंगी व भोकरदन येथे त्यांनी सभा घेतल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या संकल्पनेतील तीन विधानसभा मतदारसंघांवर पक्षाने लक्ष केंद्रित केल्याने पवारांनी त्यास साद दिली. कन्नड, फुलंब्री व वैजापूर येथे प्रचारसभा घेण्याचे नियोजन केले. कन्नड व फुलंब्रीची सभा आटोपून शरद पवार वैजापूरला जाण्यासाठी रवाना झाले. वैजापूरला रवाना होण्यापूर्वी पवारांची गुरुवारी (२ ऑक्टोबर) हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये पत्रकार परिषद होती.
उमेदवारांप्रमाणे पत्रकारही वाढले : निवडणुकांच्या काळात कुठल्याही माध्यमाच्या प्रतिनिधीला टाळायचे नाही हा पवारांचा स्थायिभाव असल्याने कुठल्याही चॅनलला अथवा दैनिकाच्या प्रतिनिधीला पवार मुलाखत देतात. शहरात सकाळी ९.१५ वाजता पत्रकार परिषद होती. पवार सकाळी ९.१५ वाजता वेळेवर पत्रकार परिषदेसाठी हॉलमध्ये हजर झाले. त्यांच्यासमवेत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, शहराध्यक्ष मुश्ताक अहेमद उपस्थित होते. पत्रकार कक्षात येताच माध्यम प्रतिनिधींची संख्या वाढल्याचे त्यांनी विधान केले. जसे मतदारसंघात उमेदवार वाढलेले आहेत तेथे पत्रकारही वाढल्याचे पवारांनी निदर्शनास आणून दिले. पत्रपरिषद सुरू झाल्यानंतर काही वेळातच औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मिलिंद दाभाडे आले. त्यानंतर काही वेळाने पूर्वचे जुबेर मोतीवाला व सर्वात शेवटी मध्यचे उमेदवार विनोद पाटील पत्रकार परिषदेत हजर झाले.

माध्यमांना पुरेसा वेळ
केवळ दोन मिनिटांत पवारांनी आपले निवेदन संपवत पत्रकारांना बोलते केले. पत्रकारांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देताना आपल्याला हवा असलेला अजेंडा पवार पेरून जातात. एका माध्यम प्रतिनिधीने प्रश्न विचारताना शेवटचा प्रश्न असा उल्लेख केला. यानंतर पत्रकार परिषद संपेल असे वाटले, परंतु त्यानंतरही दहा प्रश्न विचारण्यात आले. एखाद्यावेळी प्रश्नांची सरबत्ती सुरू असते आणि नेते अशातच पत्रकार परिषद उरकून घेतात. परंतु या वेळी पवारांनी पुरेसा वेळ माध्यमांना दिला. अखेर माध्यम प्रतिनिधींनीच पवारांना धन्यवाद म्हणत आता पुरे झाले, असे सांगितले. माध्यम प्रतिनिधींचे समाधान होईपर्यंत पवार जागेवरून उठले नाहीत.