आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2000 वर्षांपूर्वीच्या ‘कुडिअट्टम’ची मेजवानी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महात्मा गांधी मिशनच्या संगीत अकादमीच्या (महागामी) वतीने दरवर्षी होणारा शारंगदेव महोत्सव यंदा शुक्रवारपासून (18 जानेवारी) होत आहे. यात विख्यात कलावंतांची हजेरी लागणार आहे. ‘हेरिटेज आर्ट’ म्हणून घोषित करण्यात आलेली ‘कुडिअट्टम’ ही दोन हजार वर्षांपूर्वीची प्राचीन नृत्यशैली महोत्सवाचे आकर्षण आहे.

तेराव्या शतकातील देवगिरी प्रांतातील संगीतज्ञ व ग्रंथकार शारंगदेव यांच्या नावाने या चारदिवसीय संगीत व नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यंदा 18 जानेवारीला विश्वविख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, ज्येष्ठ व प्रख्यात भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. पद्मा सुब्रमण्यम व महागामी ग्रुपतर्फे कथ्थक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. 19 जानेवारी रोजी प्रसिद्ध ध्रुपद गायक आशिष संस्कृत्यायन व कथ्थक नृत्यांगना गुरू राणी कर्णा यांचा, तर 20 जानेवारी रोजी प्रख्यात तबलावादक व गुरू पं. सुरेश तळवलकर यांची संकल्पना असलेला मृदंग कीर्तन आणि नामांकित कुडिअट्टम नृत्यांगना कपिला वेणू यांचा कार्यक्रम होईल. ‘कुडिअट्टम’या नृत्यशैलीचे शहरात पहिल्यांदाच सादरीकरण होणार आहे. हे सर्व कार्यक्रम एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात दररोज सायंकाळी साडेसहाला होणार आहेत. त्याच वेळी 18 ते 21 जानेवारीदरम्यान दररोज सकाळी दहाला महागामी परिसरात परिसंवाद होणार आहे. परिसंवादात डॉ. सुब्रमण्यम, डॉ. वेणू, डॉ. भरत गुप्त, गुरू कर्णा यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच संगीत-नृत्यातील विशेष योगदानाबद्दल पं. हरिप्रसाद चौरसिया व डॉ. सुब्रमण्यम यांना यंदाचा शारंगदेव सन्मान प्रदान केला जाणार असल्याची माहिती ‘महागामी’च्या पार्वती दत्ता व एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांनी दिली.