आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिरुची संपन्न करणारा शारंगदेव महोत्सव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्राचीन शास्त्रीय नृत्य प्रकारांची शुद्धता जपत त्याला आधुनिक दृष्टीचा स्पर्श होणे हे काळाचे आव्हान आहे. हे आव्हान स्वीकारतानाच हा अनमोल ठेवा औरंगाबादकर रसिकांसमोर ठेवत त्यातून उच्चतम कलासंस्कृतीचा पायंडा पाडण्याचा सुंदर प्रयत्न म्हणजे शारंगदेव महोत्सव. दोन वर्षांपासून हा महोत्सव सुरू झाला. यानिमित्ताने एकापेक्षा एक कलाकृतींच्या माध्यमातून अभिरुची संपन्न करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते.
भरतनाट्यम व कर्नाटकी संगीताला वाहिलेल्या चेन्नईतील कलाक्षेत्र या संस्थेच्या संचालिका व विख्यात नृत्यांगना लीला सॅमसन यांच्या शिष्यांनी केलेला भरतनाट्यमचा आविष्कार अचंबित करणारा व पूर्णपणे नवखा होता. अशा प्रकारचे भरतनाट्यम असू शकते, हे अरंगेतरम व तत्सम कार्यक्रमांनाच भरतनाट्यम समजणा-या शहरवासीयांसाठी हा एक सुखद धक्का होता. शब्दश: प्रचंड ऊर्जा, वेग, विद्युतगतीची चपळाई, बोलक्या भावमुद्रा, एकजिनसीपणा, एखाद्या जुगलबंदीप्रमाणे क्षणाक्षणाला बदलणा-या प्रत्येकाच्या हालचाली आणि तरीही भरतनाट्यमच्या चौकटीत असलेला विशीतल्या युवकांचा हा कलाविष्कार डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.
नृत्याची शुद्धता जपतानाच आधुनिक दृष्टी देणा-या या भरतनाट्यम नृत्याबरोबरच ख्यातनाम ओडिसी नृत्यांगना माधवी मुद्गल व त्यांच्या शिष्यांनी केलेले सादरीकरणही रसिकांसाठी वेगळी पर्वणी होती. ओडिसीच्या चौकटीतील मोहक नृत्य काय असू शकते, हे त्यांच्या शिष्यांनी दाखवून दिले. त्याचवेळी पार्वती दत्ता यांनी सात शास्त्रीय नृत्य, सात नद्या व सात सुरांना एकत्र गुंफण्याचा विचारही उत्तमरीत्या व्यक्त झाला. माधवी मुद्गल तसेच लीला सॅमसन यांनी विचारपूर्वक थीमद्वारे ‘वेल कोरियोग्राफ्ड’ नृत्याची संकल्पना विकसित केली आहे आहे, हा शास्त्रीय नृत्याला सृजनशीलतेद्वारे आधुनिक दिशा देण्याचा प्रयत्नच म्हणावा लागेल. कल्पनातीत लयकारी, गिनती, छंद, उपज ही भावुक काव्यातून किंवा कथानकातून मांडण्याचा विचार कथ्थकचे दिशादर्शक नर्तक पं. बिरजू महाराजांनी केला.हेच आधुनिक दिशादर्शनाचे काम शारंगदेव महोत्सवातून उत्तमरीत्या होत आहे आणि होत राहो, हीच रसिकांची अपेक्षा आहे. आयटम साँगमध्ये थ्रील शोधणा-या पिढीने अशा महोत्सवांकडे एकदा जरी पाहिले, तरी त्यांना संस्कृतीचे विशाल दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित.