आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharda Satsang Committee Celebrate Sankranti Festival

वाणाच्या पैशातून सत्तर शेतकरी कुटुंबांना मदत- शारदा सत्संग समितीचे कार्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आपल्या सणोत्सवाचा आनंद इतरांना देण्याचा प्रयत्न करा, असा विचार स्वामी विवेकानंदांनी रुजवला. रामकृष्ण मिशन आश्रमाची शारदा सत्संग समिती या विचारातून विविध उपक्रम राबवत आहे. संक्रांतीच्या वाणाच्या पैशातून ७० सहावारी आणि २५ नऊवारी साड्या मंडळाने खरेदी केल्या आहेत. शेतकरी संघर्ष संघटनेच्या माध्यमातून २६ जानेवारीला जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

शारदा सत्संग समितीच्या संगीता बारगजे यांच्या निवासस्थानी बीड बायपास येथील तारक कॉलनी येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाणाच्या पैशातून सर्व सदस्यांनी ५०० रुपयांपर्यंतच्या सहावारी, नऊवारी साड्या जमा केल्या. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशा कुटुंबांना मदत व्हावी, त्यांचाही सण साजरा व्हावा यासाठी साड्या भेट देण्यात आल्या. वीस जणींचे हे मंडळ सातत्याने समाजात वेगळा विचार रुजवण्याचा प्रयत्न करत असते. मागील वर्षी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असा संदेश पतंगावर लिहून जनजागृती करण्यात आली. याशिवाय मंडळाच्या माध्यमातून इतरही वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात.

गेल्या तीन वर्षांपासून शारदा सत्संग समिती संक्रांत उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे. संगीता बारगजे यांच्या नेतृत्वाखाली गीता साळी, रेखा शिंदे, अंजली नाडगे, मंजूषा यत्नाळकर, प्रतिभा चौधरी, ज्योती जोरसिया, संगीता भालेराव, माया कुलकर्णी, अर्चना गावंडर आणि उत्तरा सूर्यवंशी आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

मदत करण्याचा प्रयत्न
-सणोत्सव साजरे करताना आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेणे महत्त्वाचे आहे. आपणही समाजाचे ऋण फेडावे यासाठी समितीच्या वतीने उपक्रम राबवले जातात. संक्रांतीनिमित्ताने मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
संगीता बारगजे, शारदा सत्संग समिती
सणाचे साफल्य ठरेल
-प्रत्येक मंडळाने किंबहुना महिलांनी हळदी-कुंकू सोहळा करण्याऐवजी समाजाच्या एका घटकाला आनंदी करण्याचा प्रयत्न करावा. तेच या सणाचे साफल्य ठरेल. आमच्याप्रमाणे प्रत्येक मंडळाने हे करावे.
गीता साळी, सदस्या