आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashthi Program News In Marathi, Saint Eknath, Divya Marathi

षष्ठी सोहळा: लाखो भक्त संत एकनाथांच्या चरणी लीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - भक्तिरसात चिंब झालेले लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात खांद्यावर भगवा ध्वज घेऊन आणि मुखी ‘भानुदास एकनाथा’चा जयघोष करत शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत उत्साहाने सहभागी झाल्याचे दृश्य पैठणनगरीत शनिवारी पाहावयास मिळाले. यंदा नाथषष्ठी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून चारशेहून अधिक दिंड्या पैठणनगरीत आल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीपासून नाथसमाधी मंदिर, नाथवाड्यात दर्शनासाठी वारक-यांच्या रांगा लागल्या होत्या. तीनदिवसीय नाथषष्ठी महोत्सवास चार लाखांपेक्षा अधिक भाविक पैठणनगरीत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा दिंड्यांमधील भाविकांची संख्या जरी घटली असली तरी दिंड्यांच्या संख्येत मात्र वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदा कोकणातील भाविकांनीही नाथषष्ठीला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.


रविवार, 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता नाथषष्ठी महोत्सव समिती विश्वस्त मंडळाच्या वतीने आमदार संजय वाघचौरे, नंदलाल लाहोटी, अपर जिल्हाधिकारी कैलास लवांदे, ज्ञानेश्वर महाराज देशमुख यांच्या हस्ते दिंडी प्रमुखांचा सत्कार व स्वागत करण्यात येणार आहे. रात्री नाथ वंशजांच्या छबिन्याची मिरवणूक
निघणार आहे.


मानाच्या दिंड्या वेगळ्या निघाल्या
नाथमंदिरातून मानाच्या दिंड्यांसह नाथवंशजांच्या दिंड्या निघतात. नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी व दत्तकपुत्र रघुनाथबुवा पालखीवाले यांनी वेगळ्या दिंड्या काढल्या. सतरा वर्षांनंतर मानाची दिंडी काढण्याचा मान रघुनाथबुवा पालखीवाले यांना मिळाला. रघुनाथबुवांच्या दिंडीनंतर नाथवंशजांनी दिंड्या काढल्या.