आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल्डरची चालबाजी, तहसीलदाराची मर्जी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीएमआयसीची (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प) चाहूल लागताच शहरालगतच्या जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. नियमानुसार वारसाहक्कात मुलींचीही नावे असल्याने जमिनीत वाटा मिळावा, अशी अपेक्षा त्यांनाही वाटू लागली आहे. त्यातूनच मग घराघरात संघर्ष आणि वाद पेटले आहेत. त्याचाच फायदा शासकीय अधिकार्‍यांपासून बिल्डर कसे घेत आहेत, याचे एक उदाहरणच येथे देत आहोत.

काय आहे नेमके प्रकरण
शेंद्रा पंचतारांकित वसाहतीलगत असलेल्या टोणगाव या गावाच्या शिवारातील गट क्रमांक 96 मधील 4 एकर 16 गुंठे जमीन ही बन्सी महादू बेलकर यांच्या नावे आहे. त्यांच्या मृत्यूनंतर या जागेचे वारस म्हणून 3 भाऊ आणि 4 बहिणी आहेत. भाऊ डॉ. बाबुराव, उत्तमराव आणि काशीनाथ बेलकर व बहिणी शकुंतला डोंगरे, शारदा क्षीरसागर, शोभा तोडकर व नंदा जाधव यांचा यात समावेश आहे. सात जणांच्या नावावर असलेले हे क्षेत्र सामाईक आहे. भाऊ आपला हिस्सा देण्यास नकार देत असल्याने चार बहिणींनी मिळून त्यांच्या वाट्याची 1 एकर काही गुंठे जमीन परस्पर विकण्याचा निर्णय घेतला. यात मध्यस्थी करत दलालाने बिल्डर प्रदीप मोटरवार यांच्यासोबत व्यवहार केला आणि जमीन परस्पर विकून टाकली. परंतु आम्ही अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन त्या बिल्डरने एक एकराच्या जागी एक हेक्टर लिहून घेतल्याचा आरोप व्यवहार झाल्यावर या चारही बहिणींनी केला आहे.

असा केला घोटाळा
संबंधित बिल्डरने जमीन नावावर केल्यानंतर ताबा मिळवण्यासाठी तहसीलदार विजय राऊत यांना नाव नोंद करण्यासाठी अर्ज केला. राऊत यांनी ‘चुकी’च्या पद्धतीने नावाची नोंद करावी, असे पत्र सजा मंगरुळचे तलाठी एन. डी. तुपे यांना दिले. या पत्राची एक प्रत घेऊन बिल्डर प्रदीप मोटरवार यांनी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन जमीन मोजणीसाठी अर्ज केला. भूमी अभिलेख कार्यालयाने याबाबत तहसीलदारांच्या पत्राच्या आधारे मोजणी झाल्याचे दाखवत थेट नकाशाच मिळवला. डीबी स्टारने विचारणा केली असता भूमी अभिलेख कार्यालयाने मात्र हा नकाशा खोटा असल्याचे स्पष्ट केले. परंतु मुख्यालयाने हा नकाशा बोगस असून खोटी कागदपत्रे बनवल्याचेही म्हटले आहे.

बिल्डरची चालढकल
डीबी स्टारने बिल्डर मोटरवार यांना नकाशाविषयी विचारणा केली, मात्र नकाशा खरा असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांत नकाशा दाखवणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र, पुन्हा दोनदा संपर्क करूनही त्यांनी चालढकल केली.

तहसीलदाराने दिले पत्र
वास्तविक या प्रकरणात बेलकर कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या सातबार्‍यात न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याच्या सूचना आहेत. याबाबत कुणालाही मोजणीचा किंवा नोंदीबाबत सूचना देण्याचा अधिकार नाही. असे असताना तहसीलदार विजय राऊत यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बिल्डर मोटरवार यांना पत्र दिले. या पत्राच्या आधारे मोटरवार यांनी बोगस नकाशा तयार केला. शिवाय नकाशाच्या आधारे पोलिसांना संरक्षणही मागितले. तहसीलदारांच्या एका पत्रामुळे बिल्डरला उर्वरित घोटाळे करण्याची संधीच मिळाली.

अशिक्षितपणाचा घेतला फायदा
आमच्या आत्या या अशिक्षित आहेत. त्यांनी जी जमीन विकली तो विषय आम्हाला मान्य होता, परंतु जास्तीची जमीन विकत घेतल्याचे बिल्डर दाखवत आहे. या प्रकरणात धोका झाला आहे.- राजेंद्र बेलकर, तक्रारदार

आमची फसवणूक करण्यात आली
भाऊ आम्हाला हिस्सा वेळेवर देत नव्हते. आम्ही आमच्या वाट्याची जमीन बिल्डरला विकली आणि आम्हाला अध्रे पैसेही मिळाले. परंतु आम्ही 1 एकर विकली, ती बिल्डरने एक हेक्टर दाखवली आहे. आमच्या हिश्श्याला केवळ 1 एकर येते, 1 हेक्टर विकण्याचा संबंधच येत नाही. याविरुद्ध आम्ही दावा दाखल केला आहे.-शोभा तोडकर, तक्रारदार बहीण

तलाठय़ाच्या कर्तव्यदक्षतेमुळे झाली पोलखोल
7 जुलै रोजी तहसीलदार राऊत यांनी तलाठी तुपे यांना पत्र पाठवले. हे पत्र बोगस व नियमबाह्य असल्याचे तुपे यांच्या लक्षात आले. त्यांनी यावर आपला अभिप्राय नोंदवत या प्रकरणात मी नियमबाह्य नोंद करू शकत नाही, असे आपले वरिष्ठ अधिकारी म्हणजे तहसीलदारांना कळवले. सातबार्‍यावर नोंद झाली नसल्याने बिल्डरने केलेली मागणी पोलिसांनीही फेटाळून लावली. केवळ तहसीलदारांच्या नियमबाह्य पत्राच्या आधारे प्रशासकी खेळी करण्यात बिल्डर मात्र यशस्वी झाले.

चुकीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न
आपल्या 6 जुलै रोजी दिलेल्या पत्रामुळे मोठा घोळ झाल्याचे लक्षात येताच तहसीलदार राऊत यांनी दोन महिन्यांनी 12 सप्टेंबर रोजी दुसरे पत्र काढून पहिले पत्र रद्द करण्याच्या सूचना तलाठय़ांना दिल्या. कुठलीही नोंद करण्याअगोदर संबंधितांना नोटीस काढावी, असेही नमूद केले. तहसीलदार राऊत यांनी पूर्वीचे पत्र रद्द करून आता मात्र हात वर केले आहेत.

थेट सवाल : एन.डी. तुपे, तलाठी
नियमबाह्य नोंदीचे पत्र आपल्याला तहसीलदारांनी दिले होते का?
-तहसीलदार साहेबांनी या प्रकरणात सातबार्‍यात नोंद करण्याचे पत्र दिले होते, परंतु ‘लीज पेंडन्सी’ असा शेरा सातबार्‍यावर आहे. त्यामुळे तशी नोंद मला नियमानुसार करता येत नाही.
मग तहसीलदारांनी आपल्याला चुकीचे काम करण्याचे आदेश दिले होते का?
-मी असे सांगू शकत नाही. तहसीलदारांनी दिलेले पत्र नियमात बसत नव्हते म्हणून नोंदी केल्या नाहीत एवढेच.
वरिष्ठांचे आदेश न पाळल्यामुळे आपल्याला काही त्रास होतो का?
-नाही, मला कुणाचाही त्रास नाही.

थेट सवाल : प्रदीप मोटरवार, बिल्डर
आपण महिलांची फसवणूक केल्याचा आरोप आहे..
- जो सौदा झाला त्याप्रमाणे मी पैसे दिले. यात मी पुरता फसलो आहे.
तहसीलदारांकडून चुकीचे पत्र कसे मिळवले?
-मी रीतसर नोंदीचा अर्ज केला होता. तहसीलदाराने मला पत्र दिले. ते चुकीचे किंवा बरोबर याच्याशी माझा काय संबंध?
भूमी अभिलेख कार्यालयात आपल्या नकाशाची नोंदच नाही. मग नकाशा आला कोठून?
-मी अर्ज केल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाने मला त्यांच्या सहीचे पत्र असलेला नकाशा दिला आहे. माझा नकाशा योग्य व खरा आहे.
अधिकारी खोटे बोलत आहेत का?
-मी खरे बोलतो आहे हेच मला माहिती.
तुम्हाला करमाड पोलिसांनी मोजणी करण्यासाठी संरक्षण का दिले नाही?
-मी अर्ज केला होता, तेव्हा सध्या नवरात्र व इतर धार्मिक सण आहेत. त्यामुळे सध्या संरक्षण देता येत नाही असे मला सांगण्यात आले.

थेट सवाल : एम. एस. कोलते, मुख्यालय सहायक, भूमी अभिलेख कार्यालय
बिल्डर मोटरवार यांची जमीन मोजली का?
-नाही, त्यांच्या जमिनीची मोजणी झाली नाही. त्यांनी तहसीलदारांचे पत्र दाखवले व मोजणीचा दावा केला. त्यांची मोजणीची एंट्री आहे, परंतु आमचे अधिकारी जेव्हा जागेवर गेले तेव्हा ते आलेच नाहीत. त्यांचे प्रकरण बंद केले आहे.
आपल्या सहीचा नकाशा बिल्डराकडे आहे, तो कसा तयार झाला?
-त्या कागदपत्रांवर माझ्या सह्या आहेत, परंतु वरचा नकाशा आम्ही दिलेला नाही. बिल्डरने तो बोगस बनवला आहे. आमच्या कार्यालयात नकाशाची नोंद नाही.
बिल्डरने नकाशा आपल्याच कार्यालयाने दिल्याचा दावा केला आहे. मग तो बोगस कसा?
-आम्ही खोटे बोलण्याचा प्रश्नच नाही. त्यांचे प्रकरण बंद केल्याच्या नोंदी आहेत. बिल्डरने ओरिजिनल नकाशा दाखवावा. त्यांच्याकडील नकाशा बोगस आहे, असा माझा शंभर टक्के दावा आहे. बिल्डर खोटे बोलतो आहे.

थेट सवाल : विजय राऊत, तहसीलदार
आपण दिलेले पत्र नियमबाह्य आहे?
-हो, पण ते प्रशासकीय कामकाज करत असताना चुकून झाले.
या पत्राच्या आधारे बिल्डरने अनेक उद्योग केले याला जबाबदार कोण?
-चूक लक्षात आल्यानंतर मी ते पत्र रद्द केले आणि दुसरे सुधारित पत्र तलाठय़ांना पाठवून योग्य कारवाईच्या सूचना केल्या आहेत.
लीज पेंडन्सीचा दावा असताना आपण नोंदीचे पत्र देऊ शकता का?
-हो बिलकूल देऊ शकतो, परंतु त्या पत्रात जेव्हा चूक झाल्याचे कळले तेव्हा त्यानंतरच्या कागदपत्रांची प्रोसेस रद्द केली आहे.