आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shetkari Sanghtna Going With Aam Adami Party, Effort For Making Third Alliance

शेतकरी संघटनेची आम आदमी पार्टीला साथ,तिसरी आघाडी निर्माण करण्‍याचा संघटनेकडून प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्रासह काही राज्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असलेल्या शेतकरी संघटनेने वैचारिक मतभेद बाजूला ठेवून आम आदमी पक्षाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत तिसर्‍या आघाडीचा पर्याय उभा करण्याचा प्रयत्नही शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीतील सत्ता काबीज केल्यानंतर अनेक राजकीय पक्षांना व संघटनांना ‘आप’चा आधार वाटू लागला आहे. त्यापैकी काही पक्ष, संघटना ‘आप’जवळ जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यात शेतकरी संघटनेची भर पडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोशी यांनी गुरुवारी (16 जानेवारी) औरंगाबादेत संघटनेच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असावी, यावर बैठकीत चर्चा झाली. त्यात कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाचा सर्मथ पर्याय निवडल्याचे समजते.
खुल्या अर्थव्यवस्थेचे काय?
शिवसेना-भाजपसारख्या पक्षासोबत जाणे चुकीचे आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने ‘आप’सोबत राहावे, अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. खुल्या अर्थव्यवस्थेला शेतकरी संघटनेचा पाठिंबा तर ‘आप’चा विरोध आहे. तरीही हा मुद्दा बाजूला ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपविरोधात तिसर्‍या आघाडीचा पर्याय उभा करण्यासाठी आपला पाठबळ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकसभेत चंद्रपूर आणि नांदेडची जागा लढविण्याचे संघटनेने ठरविले आहे. त्या वगळता इतर ठिकाणी आप किंवा तिसर्‍या आघाडीतील उमेदवारांचा प्रचार शेतकरी संघटनेने करावा, अशी ही भूमिका आहे. आतापर्यंत स्पष्ट भूमिका न घेतलेल्या भारिप-बहुजन महासंघाशीही तिसर्‍या आघाडीसाठी बोलणी करावी, असेही ठरविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.