आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमएसपी तर्फे देवगिरीमध्‍ये फ. मुं. यांचा सपत्नीक सत्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जेथे प्राध्यापकी केली, त्याच देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे 12 वर्षांनंतर बोलण्यास उभे राहतात. ‘देवगिरी महाविद्यालयाच्या परिसरात मी 30 वर्षे वावरलो. आता कायापालट अन् मायापालट काय असतो तो अनुभवतोय. माझा सपत्नीक सत्कार केला, सपत्नीक सत्कार करण्यामागे संयोजकांचा वेगळाच डाव असतो. सत्कारमूर्तीला खरेच पत्नी आहे का, असेल तर सोबत आणलेली खरीच आहे का?’ अशी सुरुवात त्यांनी केली अन् 20 मिनिटांचे त्यांचे भाषण कधी संपले ते कळलेच नाही.

मंडळाच्या वतीने 18 शिक्षक, प्रशासकीय कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यात फ. मुं. यांचा समावेश होता. या वेळी ते सत्काराला उत्तर देत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळुंके, उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, आमदार अमरसिंह पंडित, आमदार विक्रम काळे उपस्थित होते.

फ.मुं.नी सांगितलेले किस्से त्यांच्याच शब्दांत :

मी शिकवणारा प्राध्यापक होतो. आजकाल काय होते मला माहिती नाही. माझ्या वर्गात मुली जास्त असायच्या अन् त्यांना पाहण्यासाठी मुले; पण लोकांनी मला फ. मुं. म्हणजे फक्त मुलींचा शिंदे असे नाव ठोकून टाकले. मला मराठीची चिंता वाटते. कारण इंग्रजी बोलण्याच्या नादात कोण काय फेकून देईल, सांगता येत नाही. परवा माझ्याकडे माझा मावसभाऊ आला. म्हणाला, तुझी विदर्भात खूप ‘पॉप्युलेशन’ आहे. मला काय समजायचे ते समजले. मी त्याला म्हणालो बायकोला सांगू नको, नसता मी महिनोन्महिने दौरे करतो ते ‘पॉप्युलेशन’साठीच असा तिचा समज व्हायचा. लाडात आलेली बायको म्हणते, आजकाल तुमचे माझ्यावर प्रेमच राहिले नाही मुळी. नवरा म्हणतो, प्रेम नाही तर ही चार मुले इंटरनेटवरून डाऊनलोड केली का? पत्नी इंग्रजीत सांगते डाऊनलोड नाही केली, शेजार्‍याच्या पेन ड्राइव्हमधून घेतली, याला काय म्हणावे! इंग्रजी येत नाही तर थेट मराठीतून का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. न्याय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. त्यामुळे लवकरच फ. मुं.च्या नावापुढे आमदार हा शब्द लागावा, अशी अपेक्षा आमदार काळे यांनी या वेळी व्यक्त केली.