आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीतील मूळ मंदिराची जालन्याजवळ उभी राहतेय प्रतिकृती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘सबका मालीक एक’ असा संदेश देणार्‍या साईबाबांचे शिर्डीतील मूळ मंदिर कसे होते? याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. जीर्णोद्धारानंतर आताचे मंदिर सर्व सुविधांनी सज्ज झाले असले, तरी मंदिरातील मूळ धाटणीही भाविकांचे मन प्रसन्न ठेवणारी होती. हेच मूळ मंदिर आता जालन्यात उभे राहत आहे.
श्यामराव भिकाजी आल्हाट यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. त्यासाठी आजवर 20 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले आल्हाट सत्तरीच्या दशकात व्यवसायाच्या निमित्ताने जालन्यात स्थायिक झाले. काही वर्षांतच त्यांची नामवंत बिल्डर अशी ख्याती झाली. 1978 पासून ते दरवर्षी शिर्डीची पायी वारी करतात. 2010 मध्ये मुलाच्या कारला अपघात झाल्याने आल्हाट त्याला पाहण्यासाठी दुसर्‍या कारने कुटुंबीयांसह जात होते. या वेळी त्यांच्याही कारने अचानक पेट घेतला. पत्नी स्वाती, मुलगा प्रमोद, मुलगी गीता आणि सून मार्या यांच्यासह ते कारने शिर्डीमार्गे एका विवाहावरून परतत होते. दुसर्‍या कारमध्ये त्यांचा मोठा मुलगा विश्वनाथ व काही नातेवाईक होते. सुदैवाने या दोन्ही अपघातांत दोघांना इजा झाली नाही. साईंच्या कृपेमुळेच आपण वाचलो, या भावनेतून आल्हाट यांनी त्याच वेळी मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला होता.
या मंदिर उभारणीची माहिती मिळताच शिर्डीतील विश्वस्तांनीही त्यांना मदतीसाठी हात पुढे केला आहे. तामिळनाडू येथील के. व्ही रमणी यांच्याशी मूर्तीसाठी संपर्क साधण्याची सूचनाही केली. रमणी यांनीही तातडीने मूर्तीसाठी दहा लाख रुपये देऊन जयपूर येथील मूर्तिकारास ऑर्डर दिली असल्याचे आल्हाट म्हणाले.
असे असेल मंदिर
दावलवाडीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागेच हे मंदिर उभे राहत आहे. 11 गुंठे जमिनीवर उभे राहत असलेल्या या मंदिरात निवासस्थाने, ध्यानासाठी सभागृह आणि भोजन कक्ष उभारण्यात येत आहेत. सध्या पैशांअभावी हे काम थांबले असले, तरी दोन वर्षांत मंदिर पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा मानस आहे.
मित्राने दिली जमीन
आल्हाट यांचे मित्र गणेश भगुरे यांनी पिंपळगावातील अर्धा एकर जमीन देण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, व्यवसायात चढ-उतार आल्याने आल्हाट यांनी योजना बाजूला ठेवली. दोन वर्षांपूर्वी पुन्हा मंदिर उभारण्याचे ठरवले. औरंगाबाद- जालना महामार्गालगत दावलवाडी येथे बबनराव एकनाथ जाधव, धुराजी पाटील यांनी इनामी जागा दिली.