आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आत्महत्येचे सरकारला गांभीर्य नाही, शिवसंवाद दौऱ्यात शिवसेना आमदार उदय सामंत यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना (भोकरदन)- 'शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नसून जनतेशी आहे. सरकारला शेतकरी आत्महत्येचे गांभीर्य नाही. अच्छेदिनची जाहीरातबाजी करणाऱ्यांना प्रशासन चालविता येत नाही. राज्यातील तूर, कापुस, मोसंबी, उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असताना सरकार मात्र बेफिकीर आहे', अशा शब्‍दांत शिवसेनेचे रत्नागिरी येथील आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी राज्‍यसरकारवर टीका केली.
 
ते भोकरदन येथे शिवसंवाद दौऱ्यात बोलत होते. शेतकऱ्यांशी संवाद साधण्‍यासाठी शिवसेनेच्‍यावतीने शिवसंवाद दौऱ्याचे आयोजन करण्‍यात आले आहे. यावेळी माजी आंमदार संतोष सांबरे, संपर्कप्रमुख चव्हाण, जिल्हाउपप्रमुख मनीष श्रीवास्तव, नवनाथ दौड, महेश पुरोहित, भूषण शर्मा सुरेश तळेकर, रामेश्वर जंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.  
 
या वेळी माजी मंत्री सामंत म्हणाले की, 'अच्छे दिन ज्यांनी आणले त्याना प्रशासन चालवता येत नाही. जालना जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांत ताळमेळ नाही. बावणे पांगरी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली त्या शेतकऱ्याचा पीएम रिपोर्ट चारदिवस झाले तरी मिळाला नाही. त्यामुळे त्या कुटूंबाला शासनाची मदतही मिळाली नाही. याचे कुणाला गांभीर्य नाही.'
 
शिवसंवाद दौऱ्यात जालना जिल्ह्यातील बदनापूर व भोकरदन तालुक्यातील बावणे पांगरी, राजूर, सोयगाव, भोकरदन येथे शिवसेनेच्या समितीने प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्याशी संवाद साधला आणि शेतकऱ्याच्या व्यथा एकूण घेतल्या. कर्ज माफी करा, मराठा आरक्षण द्या, कापूस, तूर, मोसंबीला भाव मिळवून द्यावा, अशा व्यथा यावेळी शेतकऱ्यांनी मांडल्या. या सर्व दौऱ्याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात येईल असे उदय सांमत यांनी सांगितले 
 
यावेळी शिवसेनेच्‍या नेत्‍यांनी बावणे पांगरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाची भेट घेत त्यांच्या व्यथा ऐकल्या. यावेळी त्‍यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला नौकरी लावून देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. तसेच त्याला सर्वोतोपरी मदत शिवसेनेतर्फे केली जाईल, असेही सांगितले. राजूर येथील रखडलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे काम एका महिन्यात मार्गी लावून पूर्ण करण्यात येईल, निराधारांचे व शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल, असे माजी मंत्रि उदय सामंत यावेळी म्‍हणाले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...