आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेने स्वीकारला गुजरातेतील अमित शहा पॅटर्न!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपनेते अमित शहा आणि त्यांच्या टीमने गुजरात व उत्तर प्रदेशात राबवलेली मायक्रो प्लॅनिंग शिवसेना औरंगाबाद जिल्ह्यात वापरत आहे. ऑक्टोबर अखेरीस होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी येत्या महिनाभरात ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. शहरापासून जिल्ह्यातील सगळ्या 1200 गावांतील पक्षाचे केडर कामाला लावण्यात येत असून मतदार यादीच्या प्रत्येक पानाची जबाबदारी एकेका कार्यकर्त्याला देण्यात आली आहे. याशिवाय शिवसेनेच्या सदस्यांच्या ऑनलाइन नोंदणीचे कामही सुरू होत आहे.
गुजरात आणि उत्तर प्रदेशात भाजपने मिळवलेल्या नेत्रदीपक यशात अमित शहा व त्यांच्या टीमने राबवलेल्या यंत्रणेचा मोठा वाटा आहे. शहा व त्यांच्या टीमने निवडणुकीआधी राबवलेल्या यंत्रणेने जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचता आले. याशिवाय मतदार यादीतील प्रत्येक मतदान करून घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच तयार करण्यात आली होती. संपर्क, प्रचार, सहभाग आणि प्रत्यक्ष मतदान अशा टप्प्यांत ही यंत्रणा मतदारांपर्यंत सतत पोहोचत राहिली आणि त्यातून भाजपला हे यश मिळाले. टीम शहाच्या या मायक्रो प्लॅनिंगचा वापर शिवसेना औरंगाबाद जिल्ह्यात करत आहे.

शहरापासून गावागावांपर्यंत : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी या मायक्रो प्लॅनिंगची जबाबदारी सांभाळली आहे. त्यात औरंगाबाद शहरापासून जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातील गावापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी विविध कारणे, उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आजपासून सुरू झालेल्या ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ मोहिमेचाही यात उपयोग होणार आहे. प्रत्येक गावात पोहोचण्यासाठी म्हणून जिल्ह्यातील 1200 गावांत शिवसेनेच्या नामफलकाच्या अनावरणापासून विविध कार्यक्रम, उपक्रम होणार आहेत. पंचायत समित्यांची 125 ठिकाणे, नगर परिषदांची 6 गावे व औरंगाबादेतील 20 ब्लॉक यांचा या मोहिमेत समावेश असेल. या 146 ठिकाणी मेळावे, नामफलक अनावरण, मतदार नाव नोंदणी या माध्यमातून महिनाभरात शिवसेनेचे संपर्क अभियान चालेल.

ऑनलाइन सदस्य नोंदणी
पक्षाचे जाळे गावपातळीपर्यंत तयार करताना तरुण कार्यकर्त्यांना आकर्षित केले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन सदस्य नोंदणी केली जाणार आहे. आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणुकीआधी हा ऑनलाइन फंडा वापरून जास्तीत जास्त सदस्य नोंदले होते. त्यात तरुणांचा भरणा अधिक होता. त्याच धर्तीवर केंद्रीय पद्धतीने ही ऑनलाइन नोंदणी सेवा राज्यभरात एकाच वेळी सुरू होणार आहे.
पदाधिकारीही बदलणार?
लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानातून नव्या मतदारांचे महत्त्व समोर आल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी संघटनात्मक बदल करण्याचाही विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच शिवसेना व शिवसेनेशी संबंधित संघटनांचे बरेच पदाधिकारी बदलले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
पेज लीडर
मतदारांची नावे नोंदवल्यानंतर मतदान करून घेणे महत्त्वाचे असल्याने शिवसेना पेज लीडर ही संकल्पना वापरणार आहे. मतदार यादीतील प्रत्येक पानाची जबाबदारी एका कार्यकर्त्याकडे असेल. मतदान करून घेण्यापर्यंतची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. जिल्ह्यातील भाजपकडील मतदारसंघांसह सर्व विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचे हे मायक्रो प्लॅनिंग राबवले जाणार असल्याने दानवेंनी सांगितले.
रणनीती
नोंदणीपासून मतदानापर्यंत प्रत्येक गोष्टीचे मायक्रो प्लॅनिंग, महिनाभरात 1200 गावांत पोहोचणार, सदस्यांची नोंदणी ऑनलाइन