औरंगाबाद- औरंगाबाद मनपातही स्वबळाचा नारा देत शिवसेनेला धोबीपछाड देण्याच्या तयारीला लागलेल्या भाजपचा मुकाबला करण्यासाठी शिवसेनेने रणनीतीत बदल करणे सुरू केले असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच नागरिकांची मतेही जाणून घेणे सुरू केले आहे. विधानसभा निकालानंतर शिवसेना आता छोटा भाऊ बनली. युती तोडल्यानंतर राज्यात नंबर वन ठरलेल्या भाजपला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मोठा भाऊ होण्याची ईर्ष्या निर्माण झाली आहे. येत्या एप्रिल महिन्यात होणा-या मनपाच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वबळावर लढतील, असे आताचे तरी चित्र आहे.
काल भाजपने बैठक घेत स्वबळावरील निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची व्होटबँक असलेल्या वॉर्डांत भाजपने चमकदार कामगिरी केल्याने त्यांच्या आशा उंचावल्या आहेत. मनपा निवडणुकीत आणखी बारकाईने काम करून शिवसेनेला उखडून टाकण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. त्यासाठी शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या किशनचंद तनवाणी यांचा भाजप वापर करून घेणार आहे. शिवसेनेतही हालचाली सुरू झाल्या आहेत. निकालाचे विश्लेषण करण्याच्या नावाखाली तिन्ही मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. त्यात मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आखणीही सुरू केली आहे. प्रभारी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांनी सांगितले की, गटप्रमुख, शाखाप्रमुख व नागरिकांसोबत वॉर्डावॉर्डांत बैठका घेतल्या जात आहेत. नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांची भूमिका काय आहे, हे या टप्प्यात जाणून घेतले जात आहे. नंतरच्या टप्प्यात शिवसेना
आपले नेटवर्क वापरून निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे.
पक्ष मुसंडी मारणार : खैरे
शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, भाजपने मनपाच्या सर्व जागा स्वबळावर लढवायची तयारी चालवली असली, तरी आम्हीही शांत बसलेलो नाही. आम्ही थंड बसणार नाही. शिवसेना मुसंडी मारणार आहे. युती करायची की नाही वगैरे विषय नंतर होतील. त्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द अंतिम असेल.
शिवसेनेसमोरच्या या आहेत समस्या
भाजपच्या मुसंडीमुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चलबिचल.
पक्षांतर्गत राजकारणामुळे यंत्रणेत आलेले शैथिल्य आणि संभ्रमावस्था.
भाजपकडून आगामी काळात खिंडार पाडले जाण्याची भीती.
मोदी लाटेत शिवसेनेच्या उमेदवारांबाबत लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे.