आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena BJP Alliance To Continue For Municipal Corporation Polls

मनपा : युतीवर अखेर शिक्कामोर्तब; शिवसेनेला ६४, तर भाजपला ४९ जागा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीतील युतीबाबत शिवसेना- भाजपने १२ दिवसांत ११ बैठका घेतल्यानंतर सोमवारी सायंकाळी जागावाटपावर एकदाचे शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेला ६४ तर भाजपला ४९ वॉर्ड सोडण्यात आले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक असताना युतीबाबतची अनिश्चितता संपली आहे.

सोमवारी दुपारी औरंगाबाद जिमखाना क्लब येथे युतीची निर्णायक बैठक झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, खासदार चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, किशनचंद तनवाणी, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे हे बैठकीत सहभागी झाले होते. रविवारी रात्री ६२-५१ या समीकरणावर जवळपास एकमत झाले होते. त्यात आज सकाळी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र बैठका घेतल्यानंतर पुन्हा ओढाताण झाली. शिवसेनेच्या दोन बैठका झाल्या तर भाजपचे स्थानिक नेते दानवेंच्या भेटीसाठी जालन्याला जाऊन आले. दुपारी दानवे व भाजपचे शिष्टमंडळ परतले व थेट बैठकीलाच सुरुवात झाली.

साडे तीन वाजता बंद खोलीत नव्याने चर्चा झाली व दोन तासांनंतर जागावाटपावर तोडगा निघाला. नंतर पत्रकारांशी बोलताना दानवे व खैरे यांनी या युतीची घोषणा केली. नवीन फाॅर्म्युलानुसार शिवसेना ६४ तर भाजप ४९ जागा लढवणार आहे.

दानवे म्हणाले की, भाजपच्या स्थापना दिवशीच युती झाल्याचा आनंद आहे. आता आम्ही एकत्र प्रचार करणार आहोत. दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र बसून खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाल्याचे ते म्हणाले. खासदार खैरे म्हणाले की, युती झाली पाहिजे ही नागरिकांचीही इच्छा होती. त्यानुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती करण्याचे आदेशच दिले होते. युती झाल्याने सर्वांनाच न्याय मिळेल असे सांगत आम्हाला कुणाचे आव्हान नाही असे सांगत त्यांनी विजयाची खात्री व्यक्त केली.

भाजप मित्रपक्षांना जागा देणार
मित्रपक्षांना कुठे संधी देणार असे विचारले असता दानवे यांनी आज सेना व भाजपची युती झाली आहे. आता रिपाइं (आठवलें), महादेव जानकरांचा रासप व शिवसंग्राम यांच्याशी भाजप बोलणी करणार आहे. त्यांना आम्ही जागा देणार आहोत, असे ते म्हणाले.

महापौराचा निर्णय नंतर
जागावाटप झाले असले तरी महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती यासारख्या महत्त्वाच्या पदांच्या वाटपाबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून तो निकालानंतरच घेण्यात येईल, असे दानवे म्हणाले.