आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena And Matoshri Old Age Home Issue Aurangabad

शिवसेनेचा बुलंद आवाज मातोश्री वृद्धाश्रमात दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिवसेनेचा बुलंद आवाज, कामगारांचा तारणहार अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री साबीर शेख दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकले आहेत. हा ढाण्या वाघ सध्या विपन्नावस्थेत जीवन जगत आहे. त्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्या मुलीकडे वेळ नाही आणि ज्या शिवसेनेला त्यांनी प्रचंड उंचीवर नेऊन ठेवण्यात वाटा उचलला त्या शिवसेनेच्या गब्बर नेत्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. मात्र, साबीरभाईंच्या मदतीला औरंगाबादचा कल्पतरू विकास मंच धावून आला आहे. या मंचने त्यांना सोमवारी येथील मातोश्री वृद्धाश्रमात दाखल केले आहे.

मंत्री म्हणजे मुबलक पैसा, प्रचंड सत्ता. मंत्रिपद गेल्यावरही त्याच्याकडील पैसा कायम असतोच. मात्र, युती शासनाच्या काळात म्हणजे 1995 ते 1999 कालावधीत कामगारमंत्री म्हणून काम पाहणार्‍या शेख यांनी पैशापेक्षा समाजकारणालाच महत्त्व दिले. युतीची सत्ता गेल्यावर गटातटाच्या वादात पडले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पदरी दारिद्रय़ आले. राजकारणातही ते मागे पडत गेले. कल्याण येथील एका शंभर चौरस फूट क्षेत्रफळाच्या खोलीत राहू लागले. त्यातच त्यांना मधुमेह, पक्षाघाताने ग्रासले. एकेकाळी कामगारांच्या प्रश्नांनी सभा, बैठक, संमेलने आणि मेळावे गाजवून सोडणार्‍या साबीरभाईंसमोर जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला. कारण त्यांच्या दुबई येथे राहणार्‍या मुलीला त्यांच्याकडे पाहण्यासाठी वेळ नव्हता. शिवसेनेच्या नेत्यांना तर त्यांची आठवणही राहिली नाही. ही दुरवस्था दोन महिन्यांपूर्वी एका चॅनलने सर्वांसमोर आणली. त्यानंतरही शिवसेनेकडून मदतीचा हात पुढे आला नाही.

कल्पतरूचे योगदान
निराधार वृद्धांना मदत करण्याचे व्रत अंगीकारलेल्या कल्पतरू युवा विकास मंचचे अध्यक्ष संजय तांबे पाटील यांनी चॅनलवरील वृत्त पाहिले. त्यांनी तत्काळ कल्याण येथे जाऊन साबीरभाईंची भेट घेतली. आमच्या विनंतीला मान द्या, औरंगाबादेत राहण्यासाठी या, तेथे आम्ही तुमच्यावर उपचार करू, असे सांगितले. एकीकडे सारे आप्तेष्ट, नातेवाईक, शिवसैनिक पाठ फिरवत असताना औरंगाबादसारख्या शहरातून कुणीतरी मदतीसाठी येत आहे हे पाहून साबीरभाई गहिवरले. त्यांनी औरंगाबादेत येण्यास होकार दिला. तांबे त्यांना सोमवारी सायंकाळी घेऊन आले.

मातोश्रीमध्ये स्वतंत्र खोली
साबीरभाईंसाठी मातोश्री वृद्धाश्रमात स्वतंत्र, वातानुकूलित खोली तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत. खोलीच्या दरमहा भाड्याचा तसेच औषधोपचाराचा खर्च कल्पतरूतर्फे केला जाणार आहे.