आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेने टाळल्याने भाजपचा तिळपापड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समांतर जलवाहिनीच्या प्रत्यक्ष कामांचे थाटात उद्घाटन करताना शिवसेनेने डावलल्यामुळे भाजपचा तिळपापड झाला आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या कारणावरून आज उपमहापौर भाजप नगरसेवकांनी समांतरच्या अधिकाऱ्यांना मनपात बोलावून जोरदार हल्लाबोल केला. यापुढे डेडलाइन चालणार नाही, कबूल केलेली कामे १५ जूनपर्यंत केली नाहीत तर भाजप रस्त्यावर उतरेल, असा खणखणीत इशारा या वेळी देण्यात आला.
खासदार चंद्रकांत खैरे समांतरच्या कंपनीचे पाठीराखे असल्याने भाजपने ठरवून कंपनीच्या अधिकाऱ्यांआडून अप्रत्यक्षपणे खैरेंनाच निशाण्यावर घेतले आहे.
मनपातील शिवसेना भाजपमधील संघर्ष काल खासदार खैरे यांच्यामुळे सुरू झाला. समांतर जलवाहिनीच्या पाइपलाइन टाकण्याच्या कामांची दोन उद्घाटने त्यांनी केली. या वेळी त्यांनी भाजपच्या मंडळींना साफ टाळले. चिकलठाणा वॉर्डात भाजपच्या नगरसेविका ज्योती नाडे यांनाही बोलावण्यात आले नाही. उपमहापौरांना कार्यक्रम सुरू झाल्यावरच कळले. शिवसेनेने केलेला हा प्रकार भाजपच्या जिव्हारी लागला आहे. उद्घाटन पूर्वनियोजित नव्हते, असा खुलासा करताना खैरे यांनी यापुढे समांतरचे काम सुरू होणाऱ्या प्रत्येक वॉर्डात उद्घाटन केले जाईल, असे सांगितले; पण त्यावर भाजपचे समाधान झालेले नाही.
यापुढे डेडलाइन नाही
यावेळी नगरसेवकांनी आपल्या वॉर्डात पाण्याचे नियोजन ढेपाळले, दूषित पाणी, खराब पाइपलाइन आदी कामे सांगूनही होत नाहीत या आपल्या तक्रारींचा पाढा नेहमीपेक्षा अधिक तारस्वरात मांडला. उपमहापौरांनी त्यांना या कामांचे वेळापत्रकच मागितले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही ते दिले. त्यावर उपमहापौरांनी त्यांना १५ जून ही शेवटची डेडलाइन, तोपर्यंत कामे झाल्यास भाजपला रस्त्यावरच उतरावे लागेल, असा इशाराही दिला.
सासू बोले सुने लागे
डावलण्याचा प्रकार खासदारांमुळे झाल्याने समांतर ही खैरे यांची दुखरी नस असल्याने आज भाजपने त्यावर कडाडून हल्ला चढवला. कमल नरोटे, मनीषा मुंडे, राज वानखेडे, नितीन चित्ते, विजय औताडे, जयश्री कुलकर्णी या फक्त भाजपच्याच वॉर्डातील पाण्याचे प्रश्न सुटले नसल्याचे कारण पुढे करत उपमहापौर प्रमोद राठोड यांनी समांतरचे अर्णव घोष इतर अधिकाऱ्यांना बोलावले. या बैठकीत त्यांनी चिकलठाणा वॉर्डात उद्घाटन करताना आमच्या नगरसेविकेला का बोलावले नाही? खैरे औरंगाबादचे खासदार असतील; पण चिकलठाणा वॉर्ड जालना मतदारसंघात येतो. मग जालन्याचे खा. रावसाहेब दानवे यांना का बोलावले नाही? आ. अतुल सावेंना का बोलावले नाही, अशी प्रश्नांची सरबत्तीच केली. त्याला उत्तरे देताना समांतरच्या अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली. अर्णव घोष यांनी आम्ही खा. खैरे यांना बोलावलेच नव्हते, असे सांगत नगरसेवकांच्या संतापात भर टाकली. अखेर समांतरच्या अधिकाऱ्यांनी आपली चूक झाल्याचे मान्य केले.