आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Back Foot At Zilha Parishad Election Aurangabad District

एकाधिकारशाहीमुळेच शिवसेनेचा पराभव; जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची कबुली

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: उमेदवार निवडताना थेट स्थानिक आमदार तसेच पदाधिकार्‍यांना डावलणे, बाहेरच्या प्रचारप्रमुखांना फक्त नामधारी ठेवणे याच दोन प्रमुख कारणांमुळे शिवसेनेला जिल्हा परिषदेत विरोधी बाकावर बसण्याची वेळ आल्याचे सैनिक खासगीत मान्य करत आहेत. आम्ही थोडे कमी पडलो, अशी कबुली जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली असली तर 17 ठिकाणी विजय मिळवताना 13 ठिकाणी दुसर्‍या क्रमांकावर राहिलो. याचे रूपांतर पहिल्या क्रमांकात झाले असते तर निर्विवाद भगवा फडकला असता, असे त्यांनी बोलून दाखविले.
प्रत्येक तालुक्यासाठी स्थानिकांबरोबरच औरंगाबादचे प्रचारप्रमुख नेमण्यात आले होते. त्यांना उमेदवार निश्चितीचे कोणतेही अधिकार नव्हते. खांद्यावर भगवा टाकून फिरणे एवढीच जबाबदारी त्यांना पेलायची होती. या नामधारी प्रचारप्रमुखांकडे विचारणा केली असता त्यांनी यावर अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला. मात्र यंत्रणा शिस्तबद्धपणे कामाला लागली असती तर प्रत्येक तालुक्यात एक जागा मिळवणे शक्य होते आणि सत्तेच्या बाकावर बसणे सहज शक्य होते, असे त्यांचे म्हणणे आहे. उमेदवारांनी स्वकर्तृत्वावर विजय मिळवल्याचा दावाही काहींनी केला आहे.
वैजापूर आणि गंगापूर या तालुक्यांनी पक्षाला प्रत्येकी चार, पैठणने तीन तर औरंगाबाद तालुक्याने फक्त दोनच सदस्य दिले. सिल्लोड आणि खुलताबाद या दोन तालुक्यांतून एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊ शकला नाही. सोयगाव आणि कन्नड तालुक्यांतून प्रत्येकी एक सदस्य विजयी झाला.
नरेंद्र त्रिवेदी यांना क्लीनचिट
जिल्हाप्रमुख या नात्याने या पराभवाची जबाबदारी नरेंद्र त्रिवेदी यांच्यावर जात असली तरी दुसरे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी त्यांचा बचाव केला आहे. ते सर्व जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे त्यांना एखाद्या तालुक्यासाठी जबाबदार धरता येणार नाही, असे दानवे यांनी म्हटले आहे. त्रिवेदी यांच्यावर कन्नड तालुक्याची जबाबदारी देण्यात आली होती. तरीही तेथील अपयशाला ते जबाबदार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
औरंगाबाद तालुका
प्रचारप्रमुख - उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले
हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. आमदार संजय शिरसाट यांचा मतदारसंघ असतानाही त्यांनाच उमेदवार निवडीत डावलण्यात आले. त्यांची थेट ‘मातोर्शी’वर धडक. आमदारच प्रचारापासून दूर राहिल्याने गतवेळपेक्षा जिल्हा परिषदेची एक जागा कमी राहिली. जिल्हा परिषदेच्या लढवलेल्या 4 पैकी 2 तर पंचायत समितीच्या 6 पैकी 4 जागांवर समाधान मानावे लागले. 50 टक्के यश असले तरी बालेकिल्ल्यातील हा आकडा समाधानकारक मानला जात नाही. आम्ही प्रयत्न केले. मात्र दोन्ही ठिकाणी निसटते पराभव झाल्याचे घोडेले यांनी सांगितले.
पैठण तालुका:
प्रचारप्रमुख- माजी आमदार संदिपान भुमरे आणि औरंगाबाद पालिकेतील सभागृह नेते गिरजाराम हाळनोर
संदिपान भुमरे यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने पुढील तयारीसाठी ते झपाट्याने कामाला लागले होते. सोबतीला हाळनोर यांनीही प्रयत्न केले. जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 3 आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 7 जागा शिवसेनेला जिंकता आल्या. यशाची टक्केवारी 50 पेक्षा काहीशी पुढे जाते. गतवेळी एक जागा शिल्लक मिळाली होती. चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी यश समाधानकारक म्हणता येणार नाही. जिल्हा परिषदेत आणखी दोन उमेदवार निवडून येणे शक्य होते.
गंगापूर तालुका:
प्रचारप्रमुख- माजी आमदार अण्णासाहेब माने व नगरसेवक गोपाल कुलकर्णी
या तालुक्यातूनही पक्षाला समाधानकारक मते मिळाली. जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 4 आणि पंचायत समितीच्या 16 पैकी 10 जागा असे येथील चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत माने यांचा अपक्ष प्रशांत बंब यांनी पराभव केला होता. त्यांचा करिश्मा कायम राहील असे चित्र रंगवण्यात येत होते. मात्र शिवसेनेचा प्रभाव कायम असल्याचे निकालातून दिसून आले. प्रचाराला वेळ मिळाला असता तर जागा अजून वाढल्या असत्या, असा दावा कुलकर्णी यांनी केला.
कन्नड तालुका:
प्रचारप्रमुख- माजी आमदार नामदेव पवार आणि जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी
जिल्हा परिषदेच्या 9 पैकी सेनेच्या वाट्याला 7 जागा सोडण्यात आल्या होत्या. गतवेळी येथून दोन सदस्य निवडून आले होते. एका सदस्याची उमेदवारीच रद्द झाल्याने अधिकृतपणे पक्ष 6 जागा लढला आणि त्यातील एकावरच विजय मिळवता आला. पंचायत समितीच्या 14 पैकी चारच जागांवर समाधान मानावे लागले. गतवेळचे संख्याबळ कायम ठेवता आले नाही, याची खंत पवार यांनी व्यक्त केली. आमच्याकडून चुका झाल्या आहेत. त्या सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वैजापूर तालुका:
प्रचारप्रमुख - आमदार आर. एम. वाणी आणि माजी सभागृह नेते संतोष जेजूरकर
शिवसेनेचाच आमदार असल्याचा प्रभाव जाणवला. तालुक्यात पक्षाने जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 6 जागा लढवल्या होत्या. त्यातील 4 जागांवर विजय मिळवता आला. मात्र पंचायत समितीत त्यांना मोठा फटका बसला. पंचायत समितीच्या 12 पैकी फक्त 3 जागा मिळवता आल्या.
सिल्लोड सिल्लोड:
प्रचारप्रमुख-उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब थोरात व चिंटू अग्रवाल
विधानसभेत हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे असल्याने येथील जिल्हा परिषदेच्या 8 पैकी एकच जागा शिवसेनेला देण्यात आली होती. पंचायत समितीच्या 2 जागा पैकी एकाही जागेवर त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यातही बंडखोरी झाली होती. मात्र प्रचारासाठीही वेळ अपुरा पडल्याने खाते उघडता आले नसल्याचे थोरात यांनी सांगितले.
फुलंब्री तालुका:
प्रचारप्रमुख- जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आणि माजी सभागृह नेते संतोष खेंडके
तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव असतानाही येथे शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समितीत घवघवीत यश मिळवले. जिल्हा परिषदेच्या तीनपैकी 2 तर व पंचायत समितीच्या तिन्ही जागांवर यश मिळवले. नियोजनबद्ध प्रचारामुळे हे यश शक्य झाल्याचा दावा खेंडके यांनी केला. गणोरी गटातून राजेंद्र ठोंबरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी स्वत:च तेथे लक्ष न दिल्याने पराभव झाला.
सोयगाव तालुका:
प्रचारप्रमुख - राजीव राठोड व राजू इंगळे
सोयगाव आर्थिकप्रमाणेच राजकीयदृष्ट्याही दुर्लक्षित तालुका आहे. विधानसभेला सिल्लोड आणि लोकसभेला जालना मतदारसंघात येत असल्याने या तालुक्याची दखल कोणी फारशी कोणी घेत नाही. तालुक्यातील 3 पैकी 2 जागा पक्षाने लढवल्या आणि अवघ्या एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
खुलताबाद तालुका:
प्रचारप्रमुख- माजी आमदार अण्णासाहेब माने व उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब सानप
जिल्हा परिषदेत शिवसेनेला येथे खाते उघडता आले नाही. पंचायत समितीच्या चारपैकी दोन जागा त्यांनी जिंकल्या. या तालुक्यातही प्रशांत बंब यांचे उमेदवार होते. बहुरंगी लढतीचाही फायदा घेता आला नाही.