आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिकांनाच पडला प्रश्न, जिल्हाप्रमुख नेमका कोण ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेनेचे औरंगाबादचे जिल्हाप्रमुख नेमके कोण, असा प्रश्न शुक्रवारी तमाम शिवसैनिकांनाही पडला. कारण आमदार संजय शिरसाट यांच्या वतीनेच देण्यात आलेल्या जाहिरातीत सुहास दाशरथे व अंबादास दानवे या दोघांचाही उल्लेख ‘जिल्हाप्रमुख’ असा करण्यात आला. नरेंद्र त्रिवेदी हे ग्रामीण भागाचे जिल्हाप्रमुख आहेत. दोन जिल्हाप्रमुखांची तरतूद असताना तिसरा जिल्हाप्रमुख कसा, याचे उत्तर कोणाकडेही नव्हते.

सिल्लोड, कन्नड, फुलंब्री व पैठण या चार तालुक्यांसाठी एक व उर्वरित जिल्ह्यासाठी दुसरा असे दोन जिल्हाप्रमुख आहेत. अंबादास दानवे यांच्याकडे शहर व परिसर, तर त्रिवेदी यांच्याकडे ग्रामीण जिल्हाप्रमुखपद होते. दानवे हे गंगापूरमधून विधानसभा लढले तेव्हा त्यांच्याकडील जिल्हाप्रमुखपद सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. ही निवडणुकीसाठीची सोय असल्याचे तेव्हा शिवसेनेच्या मुखपत्रातून स्पष्ट करण्यात आले होते. पराभवानंतर दानवे पुन्हा पक्षात सक्रिये झाले ते जिल्हाप्रमुख याच नात्याने. मात्र, तरीही सहसंपर्कप्रमुख दाशरथे यांनी जिल्हाप्रमुख हे बिरुद वापरणे सोडले नाही. त्याचबरोबर नेते व कार्यकर्तेही दानवेंबरोबरच दाशरथे यांचाही उल्लेख ‘जिल्हाप्रमुख’ असाच करतात.

दाशरथे यांची नियुक्ती ही ‘सामना’तूनच झाली होती. ‘सामना’त पुन्हा जेव्हा बातमी येईल तेव्हाच पहिली नियुक्ती रद्द होईल, असे शिवसेनेत समजले जाते. मात्र, पक्षाने अधिकृतपणे काहीही जाहीर न केल्याने कार्यकर्त्यांची कोंडी होते. त्यामुळे दोघांचाही उल्लेख जिल्हाप्रमुख असा करावा लागतो, असे गेल्या आठवड्यात जाहीर कार्यक्रम घेतलेल्या एका नगरसेवकाने सांगितले.
आमच्यासाठी दोघेही जिल्हाप्रमुख
माझ्यासाठी दोन्हीही जिल्हाप्रमुख आहेत. दाशरथे हे प्रभारी होते, तर दानवे हे नियमित जिल्हाप्रमुख आहेत. शहराचा व्याप लक्षात घेता दोघेही जिल्हाप्रमुख म्हणून काम करतात. पक्षाने दुसरा निर्णय घेतला नाही म्हणून आमच्यासाठी दोघेही जिल्हाप्रमुखच. संजय शिरसाट, आमदार.