आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतरच्या बचावासाठी शिवसेना उतरली मैदानात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतरच्या विरोधात मित्रपक्ष भाजप व विरोधी पक्ष एमआयएमने तीव्र आघाडी उघडल्याने आता शिवसेना समांतरच्या बचावासाठी उतरली आहे. भाजपचे नाव न घेता काही पक्ष ही योजना मंजूर करताना आघाडीवर होते व आता टीका करीत आहेत, असे टीकास्त्र सोडले. शिवाय भाजपचे नवे स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांनी समांतरचा बँड वाजवण्याबाबत केलेले विधान चिल्लर असल्याची टीकाही शिवसेनेने केली आहे.

भाजपचे दिलीप थोरात यांनी स्थायी समिती सभापतिपद स्वीकारताच पाणी दिले नाही तर समांतरचा बँड वाजवावा लागेल, असे विधान करीत शिवसेनेची चांगलीच अडचण करून टाकली. त्यामुळे आज पोलिस आयुक्त यांनी समांतरबाबत आयुक्तालयात बैठक घेतली. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांची भेट घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात निवेदन दिले. निवेदनातील रोख भाजपवरच असून त्यात म्हटले आहे की, ठेकेदार व अधिकारी यांच्यातील समन्वयाअभावी या योजनेची बदनामी केली जात आहे. जे पक्ष ही योजना मंजूर करताना आघाडीवर होते तेच आता योजनेवर टीका करीत ती बंद करण्याची भूमिका घेत आहेत, असे सांगत या योजनेची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.
निवेदनात पाणीपुरवठा अधिक प्रभावी करण्यासाठी फारोळा व पैठणच्या पंप स्टेशनची यंत्रणा आधुनिक करण्याची गरज करण्यात व्यक्त करण्यात आली. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले की, कंपनीकडून काम करून घेण्याची जबाबदारी मनपाची आहे. कंपनी व जनता यांच्यात समन्वय नसल्याने प्रश्न चिघळत चालला आहे. महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल म्हणाले की, कंपनीने कराराचे पालन करावे तसेच मनपानेही कंपनीने दिलेल्या टप्प्यानुसार काम होत आहे की नाही ते पाहायला हवे. आम्ही कंपनीच्या विरोधात नसून नागरिकांना पाणी मिळायला हवे. सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी कंपनीला नोटीस देण्याची मागणी केली.
शिष्टमंडळात बंडू ओक, राजू वैद्य, संतोष जेजूरकर, बाळासाहेब थोरात, सुनीता आऊलवार, माधुरीजोशी, सुनीता देव, अनिता मंत्री, प्रतिभा जगताप यांचा समावेश होता.

कोण काय म्हणते?
नियोजनबद्ध शहराच्या विकासासाठी ही योजना आवश्यकच आहे. त्यामुळे या योजनेवर टीका करणे चूक आहे. काही लोक बँड वाजवण्याच्या गप्पा मारतात ते चुकीचे अाहे.
अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख शिवसेना

भाजपची भूमिका नागरिकांना व्यवस्थित व पुरेसा पाणीपुरवठा झालाच पाहिजे, ही आहे. ती कुणाला चिल्लर वाटत असेल तर आमचा नाइलाज आहे, नागरिकांसाठी आम्ही भांडणारच.
दिलीप थोरात, स्थायी समिती सभापती