आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून कोपरखळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बाळासाहेब ठाकरे यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी नियोजन करून शहरातून हजारो कार्यकर्ते जाणार आहेत. त्यासाठी मध्यवर्ती प्रचार कार्यालयात आयोजित बैठकीत भाषण करणाऱ्यांनी केवळ एकमेकांना कोपरखळ्या मारल्या.

मुंबईला शिवतीर्थावर होणाऱ्या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली सावरकर चौकातील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी विधानसभा निवडणुकीत जवळच्या व्यक्तींकडूनच विश्वासघात झाल्याने नाराजी व्यक्त केली. आमदार संदिपान भुमरे यांनी बाळासाहेबांमुळे चौथ्यांदा आमदार झाल्याचे सांगितले. तसेच शेवटपर्यंत मी बाळासाहेबांचाच शिवसैनिक राहील असे म्हणून त्यांनी जैस्वाल यांच्याकडे बघत मी बरोबर बोलतोय का ? अशी कोपरखळी मारली. आमदार संजय शिरसाट यांनी मोर्चा सांभाळत सर्व आमदारांचे वैयक्तिक काम मोठे होते, म्हणूनच ते निवडून आल्याचे स्पष्ट करून नेते म्हणवणाऱ्यांनी काहीच केले नाही असा आरोप केला. जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी पुण्यस्मरण फळवाटप, भजन, कीर्तन करण्याचा सल्ला दिला. अंबादास दानवे यांनी मोबाइलमधील कविता वाचून दाखवत खरं बोलणाऱ्यांचा राग येतो. मग तो कुणीही असो म्हणत माझा राग खैरे साहेबांनाही येत असल्याचा टोमणा मारला. समारोप खासदार चंद्रकांत खैरे यांच्या भाषणाने झाला. त्यांनी मर्द माणूस म्हणून जैस्वाल यांचा गौरव केला. अंबादास दानवे यांची कल्पना प्रशंसनीय असल्याचे म्हणाले. भाजपच्या वेळखाऊ वृत्तीमुळे प्रचारासाठी वेळ कमी पडल्याने अनेक ठिकाणी सेनेचा पराजय झाल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी महापौर कला ओझा, सभागृहनेता किशोर नागरे, गजानन बारवाल, सभापती विजय वाघचौरे, सुनीता आऊलवार, ऋषिकेश खैरे, बंडू ओक, नंदकुमार घोडेले, बाबासाहेब जगताप, डॉ. अण्णा शिंदे, मनाजी मिसाळ, राजेंद्र ठोंबरे, सुरेखा जाधव, राजेंद्र ठोंबरे, शारदा गिते, त्र्यंबक तुपे, मोहन मेघावले, मकरंद कुलकर्णी, गिरजाराम हाळनोर उपस्थित होते. गोल्डन मॅनला जाऊ द्या, तनवाणी यांची खबर घेत स्वत:च्या फायद्यासाठी गोल्डनमॅन दुसऱ्या पक्षात गेले. आपण सुज्ञ शिवसैनिक आहात आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको होते. कार्यकर्त्यांनी शिवसैनिक म्हणून काम करावे, पद आणि तिकिटाच्या मागे पळू नये असे आवाहन खैरे यांनी केले.