आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Leader MP Chandrakant Khaire News In Marathi

दिल्लीच्या अनुभवातून धडा घ्यावा, खासदार खैरेंचा दानवेंना टोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- इतर पक्षांतील सहा नगरसेवक भाजपत दाखल झाल्यानंतर शहरात आम्हीच मोठे भाऊ, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी केला. त्यावर शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर देताना दानवे यांचा नामोल्लेख टाळत, "भाजपवाल्यांनो, दिल्लीच्या अनुभवातून काहीतरी शिका; अन्यथा येथेही तसेच हाल होतील. काहीही झाले तरी महापौर हा शिवसेनाचाच असेल,' असा दावाही केला.

दुसऱ्याच्या घरातील पोरांना घरात घेतल्याने कोणी मोठे झाल्याचे ऐकिवात नाही, असे म्हणत दानवेंचे नाव न घेता खैरे यांनी सांगितले की, आम्ही बरोबरीचेच आहोत. दोनदा आमदार अन् आता चौथ्यांदा खासदार झालो आहोत. पण त्यांना प्रदेशाध्यक्षाचे पद मिळाले म्हणजे ते काही खास झाले असे नाही. इतर पक्षांतील आपमतलब्यांना त्यांनी पक्षात घेतले अन् आम्ही मोठे झालो असे म्हणू लागले. जे त्यांच्या पक्षात स्वार्थासाठी गेले ते काही दिवसांत दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात. मात्र शिवसेना सर्वदूर आहे. आम्ही सर्वत्र लढू अन् जिंकूही. तेव्हा त्यांना कळेल की शिवसेना काय चीज आहे. काहीही झाले तरी येथील महापौर शिवसेनेचाच होईल आणि हीच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली ठरेल. त्यासाठी आम्ही तयारी केली आहे. आमचे सैनिक लढतील. दुसऱ्या पक्षातून कोणाला घेऊन लढण्याइतकी आमची ताकद कमी झाली नाही. ज्यांची ताकद कमी असते ते दुसऱ्याच्या भरवशावर लढतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

...तर इज्जत राहिली असती
दिल्लीत भाजपने बाहेरचे उमेदवार आयात केले. त्यामुळे ७० पैकी तीनच जागा मिळाल्या. स्वत: कार्यकर्त्यांसह लढले असते तर किमान ४० जागा त्यांनी जिंकल्या असत्या. आयात केलेल्यांना घेऊन लढल्यास काय होते याचे जिवंत उदाहरण म्हणजे दिल्ली आहे. त्यातूनही ते बोध घेत नसतील तर बुडत्या जहाजाला कोणी वाचवावे, असा टोमणाही त्यांनी लगावला.