आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Aurangabad Lok Sabha Constituncy, Divya Marathi

लाटेमुळे बनलेला शिवसेनेचा बालेकिल्ला मतविभागणीमुळेच तग धरून !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 90 च्या दशकात शिवसेनेच्या लाटेमुळे तो शिवसेनेच्या ताब्यात गेला अन् पुढे विरोधकांतील अंतर्गत वाद अन् मतविभागणीमुळे तगून राहिला. मागील दोन निवडणुकांतील मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हा बालेकिल्ला विरोधकांतील वादांमुळेच शाबूत असल्याचे स्पष्ट होते. या वेळी काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले तर हा बालेकिल्ला अभेद्य राहील, अन्यथा तो दोन दशकांनंतर पुन्हा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.


1989 आणि 91 च्या निवडणुकीत शिवसेनेची लाट होती. त्यामुळे मोरेश्वर सावे यांनी अनुक्रमे काँग्रेसचे सुरेश पाटील व ज. द.चे डॉ. रफिक झकेरियांना पराभूत केले. त्यानंतर विधानसभेतही शिवसेनेच्या आमदारांनी प्रवेश केला. महानगरपालिकाही ताब्यात घेतली. 1996 ला याच लाटेवर प्रदीप जैस्वाल खासदार झाले. अविनाश डोळस (भारिप), तेजस्विनी जाधव (काँग्रेस बंडखोर) यांच्यातील मतविभाजनाचा फटका काँग्रेसच्या सुरेश पाटलांना बसला. विशेष म्हणजे मोरेश्वर सावे यांनी या वेळी बंडखोरी केली होती.


1998 च्या मध्यावधीत मतांची विभागणी झाली नाही. प्रदीप जैस्वाल आणि काँग्रेसचे रामकृष्णबाबा पाटील यांच्यात थेट लढत होती. अन्य तीन अपक्ष रिंगणात होते. मतविभाजन न झाल्याने पाटील हे 30 हजारांच्या फरकाने विजयी झाले अन् हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 13 महिन्यांनी पुन्हा मध्यावधी झाली. या वेळी खैरेंविरुद्ध माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले रिंगणात होते. परंतु राष्ट्रवादीचे बाबूराव पवार, रतन पंडागळे यांनी काँग्रेसची पारंपरिक मते खेचली अन् खैरे विजयी झाले. 2004 मध्येही मतविभाजनाची पुनरावृत्ती झाली. खैरे यांना या वेळी रामकृष्णबाबा यांचे आव्हान होते. मात्र अपक्ष शेख सलीम, माधवराव बोर्डे (बसप), प्रकाश निकाळजे, अब्दुल माजेद कुरेशी यांनी काँग्रेसची परंपरागत मते एकत्र येऊ दिली नाही. त्यामुळे खैरे दुसर्‍यांदा लोकसभेत पोहोचले. 2009 ला 22 उमेदवार रिंगणात होते. खैरे हॅट्ट्रिक करणार का, याची उत्सुकता होती. वेरूळ मठाचे शांतीगिरी महाराज यांनीही मैदानात उडी घेतली. ते शिवसेनेची मते घेतील, असा अंदाज होता. त्यामुळे काँग्रेसचे उत्तमसिंह पवार सहज विजयी होतील, असा दावा करण्यात येत होता. परंतु प्रत्यक्षात शांतीगिरींना मिळालेल्या 1 लाख 48 हजार मतांमध्ये काँग्रेसचीच मते जास्त होती. मनसेचे सुभाष पाटील (16 हजार) त्याशिवाय सय्यद सलीम यांनी 32 हजारांवर मते घेऊन काँग्रेसची मते आपल्या पारड्यात घेतली. परिणामी खैरेंनी विजयाची हॅट्ट्रिक केली. केवळ मतविभाजन हेच खैरे यांच्या विजयाचे गुपित होते. यंदा आपचे सुभाष लोमटे, काँग्रेस बंडखोर तथा समाजवादी पक्षाचे उमेदवार अँड. सदाशिव गायके, वेल्फेअर पार्टीचे फिरोज खान हे उमेदवार काँग्रेसच्या किती मतांचे विभाजन करतात, यावरच खैरे यांचा लोकसभेचा चौथा विजय अवलंबून आहे. मतांचे विभाजन झाले तर हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला, अन्यथा पुन्हा काँग्रेसचा मजबूत गड, असे समीकरण आहे.