आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, State Assembly Election

शिवसेनेच्या 90% विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीटे; पहिली यादी 15 ऑगस्टला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत आघाडी देणार्‍या विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्याचे शिवसेनेने निश्चित केले असून जवळपास 90 टक्के नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. या आमदारांना निकालानंतर लगेचच कामाला लागण्याचे संदेश पोहोचवण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने राज्यात 42 जागा जिंकत जोरदार कामगिरी केल्यावर दोन्ही पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत मोठ्या भावाच्या भूमिकेत राहण्यासाठी शिवसेनेने जास्तीत जास्त जागा जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे भाजपही मोदींच्या प्रभावामुळे राज्यात मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. भाजपने 15 आॅगस्टपर्यंत उमेदवारांची नावे निश्चित करण्याचे जाहीर केले आहे. इकडे शिवसेनेने मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नावे निश्चित केली आहेत. शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीतील कामगिरी हा निकष लावत ज्या आमदारांच्या मतदारसंघात आघाडी मिळाली त्यांना तिकीट देण्याचे पक्षाने ठरवले आहे. 90 टक्के उमेदवारांची नावे निश्चित झाल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले आहे. याशिवाय गेल्या विधानसभेत कमी मतांनी पडलेल्या ज्या जागांवर या लोकसभा निवडणुकीत आघाडी मिळाली त्या मतदारसंघांवर अधिक जोर देण्यात येणार आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी औरंगाबादेत मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यात पदाधिकार्‍यांना तयारीला लागण्याचा कानमंत्र देण्यात आला. मराठवाड्यात शिवसेनेने विधानसभेच्या 27 जागा लढवून आठ ठिकाणी विजय मिळवला होता. या आठपैकी बहुतांश आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. परभणीत आमदार संजय जाधव लोकसभेवर निवडून गेल्याने त्या जागी नवीन उमेदवार शिवसेनेला द्यावा लागणार आहे.
10 टक्क्यांचा निर्णय महिनाभरात
चांगली आघाडी मिळवून देणे हा निकष आहेच. शिवाय आमदारांची विधिमंडळातील कामगिरीही पाहण्यात आली. त्यातूनच 90 टक्के नावे निश्चित झाली आहेत. उरलेल्यांच्या चाचपणीचे काम सुरू आहे. ते महिनाभरात संपेल. नावे निश्चित करून त्या आमदारांना कामाला लागण्याचे संदेश लोकसभेच्या निकालानंतरच देण्यात आले आहेत, असे शिवसेना नेत्यांनी सांगितले.