आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला खिंडीत गाठण्याची आता शिवसेनेची नवी खेळी, दोन वर्षांनंतर नगरसेवकांची बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रथमच शिवसेनेच्या नेत्यांनी नगरसेवकांची बैठक घेतली. शिवसेना भाजपमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत भाजपची कोंडी करण्याची रणनीती आखण्यात आली. शहराला भाजपचा महापौर असल्याने सर्व नगरसेवकांनी आक्रमक होऊन भाजपची कोंडी केली पाहिजे, त्यांना आवर घातला पाहिजे, भाजप नगरसेवकांना कोणीही साथ देऊ नये, अशा स्पष्ट सूचना नेत्यांनी दिल्या. 

जुन्या मोंढ्यातील एका हॉटेलात झालेल्या या बैठकीत संपर्क नेते विनोद घोसाळकर, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, तिन्ही शहरप्रमुख अनुक्रमे राजू वैद्य, बाळासाहेब गायकवाड संतोष जेजूरकर, उपमहापौर स्मिता घोगरे, स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, सभागृहनेते गजानन मनगटे, राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ सदस्य या नात्याने या वेळी माजी महापौर त्र्यंबक तुपे तसेच नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, विकास जैन, मेघावाले, तर नव्यानेच विजयी झालेल्या सीमा खरात यांनी नगरसेवकांच्या वतीने मत मांडले. 

भाजपला आवरण्याचाच अजेंडा
कोणत्याहीपरिस्थितीत महानगरपालिकेत भाजपला आवर घातला पाहिजे, हाच या बैठकीचा ‘अजेंडा’ होता. त्यासाठी नेमके काय केले पाहिजे, यावर नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यात प्रत्येक विषयात भाजपला घेरले पाहिजे, विषयपत्रिकेचा नगरसेवकांनी सविस्तर अभ्यास केला पाहिजे, सभेच्या आदल्या दिवशी ‘प्री जीबी’ व्हायला हवी, जी की पूर्वी होत असे. अलीकडे ती बंद पडली आहे, ती नव्याने सुरू करण्यात यावी, आपलेच सदस्य वेगवेगळ्या वेळी विषय उपस्थित करतात, यापुढे तसे करता सर्वांनी एकत्रितपणे एका विषयाच्या मागे उभे राहिले पाहिजे, अशा सूचना पुढे आल्या. सीमा खरात यांनी यापुढे महिला नगरसेविका भाजपच्या महापौरांना कोंडीत पकडतील, असे सांगितले. आतापर्यंत भाजपचा नगरसेवक होता, त्यामुळे आम्ही बोलत नव्हतो, यापुढे आक्रमकपणे बोलू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही
भाजपला कोंडीत पकडण्याचे सल्ले नेत्यांनी दिले असले तरी नेत्यांमध्येही वादाची धग कायम असल्याचे दिसून आले. घोसाळकर यांनी मार्गदर्शन करताना प्री जीबी घ्या, उपमहापौरांच्या दालनात बैठक झाली पाहिजे, असे सांगितले. त्याचबरोबर आयुक्तांशी नाहक वाद घालण्यात अर्थ नाही, असा सल्ला दिला. त्यानंतर बोलताना खासदार खैरे यांनी मात्र प्री जीबीची बैठक ही उपमहापौरांच्या नव्हे, तर सभागृह नेत्याच्या दालनात व्हायला हवी, असे सांगितले तर भाजपबरोबरच आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनाही कोंडीत पकडायला हवे, त्यासाठी मीही मदत करतो, असे खैरे यांनी सांगितले. एकूणच नगरसेवकांना सल्ला देताना नेत्यांमध्येही एकवाक्यता नव्हती. 

जमेल ते करण्याचा सल्ला 
मुंबई मनपात भाजपबरोबर युती होणार की नाही, हे अजून गुलदस्त्यात आहे. तेथे युती झाली नाही तर औरंगाबादेत काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे गुरुवारच्या या बैठकीत नगरसेवकांना थेट आदेश देण्यात येईल, असे अनेकांना वाटले होते. परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही. भाजपच्या महापौराला घेरा, कोंडीत पकडा, मोकळे सोडू नका, असा पारंपरिक सल्ला देण्यात आला. पालिकेत सेनेचीच दादागिरी कशी चालते हे सिद्ध करण्यासाठी नगरसेवकांनी त्यांना जे जमेल ते करावे, असे सांगण्यात आले. 

निवडणुकीनंतरची पहिलीच बैठक 
पालिका निवडणूक झाल्यानंतर प्रथमच नगरसेवकांना एकत्र बोलावून अशा प्रकारची ही पहिलीच बैठक घेण्यात आली. यापुढे नगरसेवकांना वेळोवेळी एकत्र बोलावून त्यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या संघटनेच्या बैठकीत भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप केल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. तेव्हाच यापुढे सेना भाजपला कोंडीत पकडण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करेल, असे संकेत मिळाले होते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...